मुंबई, दि. १०: वाचन संस्कृती वाढीस लागावी, तसेच मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, विकास, जतन आणि संवर्धन व्हावे, या उद्देशाने माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ‘घेऊया एकच वसा, मराठीला बनवूया ज्ञानभाषा’ ही यावर्षीच्या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
राज्य शासनाचे सर्व मंत्रालयीन विभाग तसेच त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था/मंडळ, सार्वजनिक उपक्रम, सर्व आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी कार्यालये हे ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणार आहेत. यामध्ये ऑनलाईन तसेच प्रत्यक्षरित्या कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त केवळ ललित साहित्यापुरते कार्यक्रम मर्यादित न ठेवता, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, पर्यावरण, आरोग्य, संगणक, अवकाश विज्ञान विषयांचा समावेश कार्यक्रमात करण्यात येणार असून जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्यात येतील. यात अनुवाद लेखन, व्यावसायिक लेखन, ई-बुक, स्व-प्रकाशन, ऑनलाईन पुस्तक विक्री, संहिता लेखन, शॉर्ट फिल्म/डॉक्युमेंटरी लेखन यासारख्या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, व्याख्याने, चर्चासत्रे, अभिवाचन, सामूहिक वाचन, ग्रंथ प्रदर्शन, आणि ‘मराठी वाचन कट्टा’ ची निर्मिती, मराठी आभासी /प्रत्यक्ष साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा, या उद्देशाने न्यायव्यवहार, शासन प्रशासन, प्रसार माध्यमे इत्यादी ठिकाणी होणाऱ्या मराठी भाषेच्या वापराबाबत जागरूकता वाढविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषद, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि मुंबई मराठी साहित्य संघ यासारख्या साहित्य संस्थांची मदत घेतली जाणार आहे. ग्रंथालये, महाविद्यालये, तंत्रमहाविद्यालये, पदविका संस्था या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील संबंधित संस्था देखील वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करणार आहेत. त्याचबरोबर महापालिका/नगरपालिका यांच्या अखत्यारितील संस्था देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत, असे मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
०००
संजय ओरके/विसंअ/