Pune | Sat, 11 October 2025

Ad

द्राक्ष बागायतदार संघटनेच्या मागण्या शासनस्तरावर स्वीकारणार –कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Sunil Goyal | 2 views
द्राक्ष बागायतदार संघटनेच्या मागण्या शासनस्तरावर स्वीकारणार –कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर दि. १० (जिमाका):  सध्या शेतकऱ्यांना बहुतांश अडचणींचा सामना करावा लागत आहे. मी स्वत: द्राक्ष बागायतदार असून मला द्राक्ष बागायतदारांच्या समस्यांची जाण आहे. आजच्या चर्चासत्रात द्राक्ष बागायतदार संघटनांकडून करण्यात आलेल्या सर्व मागण्या शासनस्तरावर स्वीकारणार असून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आयोजित द्राक्षावरील फळ छाटणी चर्चासत्राचे उद्घाटन मंत्री भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले, उपाध्यक्ष मारुतराव चव्हाण, संघटनेचे खजिनदार शिवाजी पवार, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी रामचंद्र माळी, जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार इत्यादी उपस्थित होते.

मंत्री भरणे म्हणाले, मी स्वत: द्राक्ष बागायतदार आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदाराच्या अडीअडचणी मला माहित आहेत. अतिवृष्टीने झालेले बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसानीसाठी पॅकेज क्रॉप कव्हर अनुदान यासह या चर्चासत्रात ज्या काही मागण्या द्राक्षबागायतदारांनी केल्या आहेते त्या सर्व मागण्यांचा स्वीकार करून शासनस्तरावर सकारात्मक दृष्टीने मांडून बागायतदारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री भरणे यांनी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या कामाचे कौतुक केले. तसेच संघटनेच्या वतीने आयोजित हे चर्चासत्र म्हणजे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने मेजवानीच असल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चासत्राचा उपयोग करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी द्राक्ष बागायतदार संघटनेचे अध्यक्ष भोसले यांनी सीना नदी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी, 10 एचपी मोटारीसाठी वीज मोफत द्यावी, क्रॉप कव्हर साठी 50 टक्के अनुदान अशा मागण्या करून त्या शासनाने सोडवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp