छत्रपती संभाजीनगर, दि. २ (जिमाका): महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ व मे. मफतलाल इंडस्ट्रीज लि. यांच्या मार्फत जिल्ह्यातील 15 वितरण केंद्रांवर होत असलेल्या गृहपयोगी संचाच्या वाटपाबाबतच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात त्यांनी हे वितरण पूर्णतः निःशुल्क असून कुणाकडून पैशांची मागणी केल्यास तात्काळ पोलिसांत तक्रार द्यावी असे आवाहन त्यांनी केले असल्याचे सहाय्यक कामगार आयुक्त ग.भा. बोरसे यांनी कळविले आहे.
बैठकीत वितरण केंद्र प्रतिनिधींना संचाचे वाटप मंडळाच्या नियमानुसार पूर्णतः नि:शुल्क करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. केंद्रावर आर्थिक व्यवहार होत असल्यास संबंधित केंद्रावर तातडीने कारवाई करून ते बंद करण्यात येईल, असेही पालकमंत्री यांनी सूचना केल्या.
संच वाटप मंडळाच्या आदेशानुसार भेट पद्धतीने (Appointment System) होणार असून, लाभार्थ्यांनी http://hikit.mahabocw.in/appoinment या संकेतस्थळावर भेट देऊन नियोजित वेळ घेऊन संच मिळवण्यासाठी दिनांक व वितरण केंद्राची निवड करावी लागणार आहे. कामगारांनी ओळखपत्र/आधारकार्ड व नियुक्ती पत्र घेऊन उपस्थित राहिल्यानंतरच संच प्रत्यक्ष दिला जाईल.
कामगारांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही एजंट, संघटना किंवा त्रयस्थ व्यक्तीकडे न वळता थेट मंडळाच्या प्रणालीतून संच मिळवावा. पैशांची मागणी केल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा नियुक्ती पत्रावरील क्रमांकावर तक्रार दाखल करावी.
०००