नाशिक, दि. १० (जिमाका) : अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज नाशिक येथील डॉ. दिग्पाल गिरासे, आणि मयूर अलई यांच्या कुटुंबांतर्फे अनुक्रमे ५१ हजार आणि ५१ हजार १११ रुपयांचा मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओझर विमानतळ येथे सुपूर्द केला.
या मदतनिधीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी गिरासे आणि अलई कुटुंबांचे कौतुक केले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. गिरासे यांच्या पत्नी शुभांगी गिरासे, मुले अद्वैका आणि कियांश, मयूर अलई यांच्या पत्नी प्रियांका अलई, मुले आरोही आणि आरव उपस्थित होते. डॉ. गिरासे आणि अलई कुटुंबाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेली मदत बहुमोल असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
डॉ. गिरासे यांनी सांगितले की, मुलांनी दिवाळीत खर्च करण्याऐवजी हा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची इच्छा बोलून दाखविली. त्यानुसार मदतीचा धनादेश आज मुख्यमंत्र्यांकडे प्रदान करण्यात आला.
०००