कधी काळी सरकारी कार्यालयात पाऊल टाकलं की सर्वप्रथम नजरेत भरायचे ते म्हणजे टेबलांवर रचलेले फाईलींचे डोंगर. धूळ, उघडी पानं, आणि त्या सगळ्यांच्या गर्दीत हरवलेले अर्ज– हे दृश्य भारतीय प्रशासनाची ओळख बनले होते. “फाईल अजून आली नाही”, “सही बाकी आहे”, “प्रकरण मंत्रालयात आहे” – अशी उत्तरं नागरिकांनी वर्षानुवर्षे ऐकली. शासनाकडे केवळ हक्कासाठी नव्हे, तर आपली फाईल ‘अडकू नये’ म्हणूनच लोकांना फेऱ्या माराव्या लागत. या सगळ्याचं कारण साधं होतं, शासनाची प्रणाली पूर्णपणे कागदांवर चालायची. फाईल हातोहात फिरवली जायची. ती कुठे हरवली, कोणाकडे अडकली हे शोधणं म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं काम होतं. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष नजरेने ही बाब हेरली आणि 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या कामात प्रत्येक विभाग आणि कार्यालयाला ई-ऑफिस प्रणालीवर येणे अनिवार्य केले. बघता बघता नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात एक नाही तर तब्बल 34 कार्यालये आजतागायत ई-ऑफिस प्रणालीवर आली आहेत.
ई-ऑफिसचा जन्म
2000 च्या दशकात सरकारने ठरवलं की बदल आवश्यक आहे. देश माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश करत होता. तेव्हा ‘ई-गव्हर्नन्स’ ही संकल्पना पुढे आली. शासनाच्या प्रत्येक कामकाजात डिजिटल तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न सुरु झाला. राष्ट्रीय माहिती केंद्राने (NIC) या संकल्पनेला प्रत्यक्ष रूप दिलं आणि ई-ऑफिस प्रणाली विकसित केली. कल्पना साधी पण क्रांतिकारक होती-कागदाऐवजी संगणक, हस्ताक्षराऐवजी डिजिटल सही, आणि फाईलऐवजी ऑनलाईन व्यवस्थापन. या प्रणालीत प्रत्येक अर्ज, पत्र किंवा प्रस्ताव डिजिटल स्वरूपात तयार होतो. त्यावर अधिकाऱ्यांची टिपणी, आदेश आणि निर्णय थेट ऑनलाइन नोंदवले जातात. “फाईल कुठे आहे?” हा प्रश्न कायमचा संपतो.
बदलाची पहिली पाऊले
सुरुवातीला सर्व काही सोपं नव्हतं. अनेक कर्मचाऱ्यांना संगणकाची सवय नव्हती. की-बोर्डवर टायपिंग करणे अवघड वाटत होते. कागदावर काम करण्याची मानसिकता खोलवर रुजलेली होती. पण जसजसा अनुभव वाढला, तसतसे वातावरण बदलू लागले. पहिल्या काही फाईली वेळेत पूर्ण झाल्या, काही अर्ज अपेक्षेपेक्षा जलद मंजूर झाले. लोकांना जाणवलं की ई-ऑफिस ही केवळ तांत्रिक प्रणाली नाही, तर कामकाजाच्या संस्कृतीतला बदल आहे. कागदावरील अवलंबित्व कमी झालं, खर्च घटला, आणि निर्णय प्रक्रियेला वेग आला. अधिकाऱ्यांना कामावर अधिक नियंत्रण मिळालं, आणि नागरिकांना वेळेवर प्रतिसाद मिळू लागला.
नंदुरबारचा डिजिटल प्रवास
महाराष्ट्रातील नंदुरबार हा आदिवासीबहुल, डोंगराळ आणि दुर्गम जिल्हा. इथल्या नागरिकांसाठी प्रशासनाची दारे नेहमीच थोडी दूर वाटायची. अर्ज दिल्यानंतर तो पुढे गेला का, कुणाकडे गेला, मंजुरी कधी मिळेल हे समजणं अवघड असायचं. पण काही वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात ई-ऑफिसची अंमलबजावणी झाली. प्रशिक्षण देण्यात आलं, नेटवर्क सुधारण्यात आलं, आणि प्रत्येक विभागाला या प्रणालीशी जोडण्यात आलं. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आलेला अर्ज थेट संगणकावर नोंदवला जातो. त्याची स्कॅन प्रत प्रणालीवर अपलोड होते, संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवली जाते आणि त्याची स्थिती रिअल-टाईममध्ये दिसते. नागरिकाला अर्जाचा क्रमांक मिळतो, ज्याद्वारे तो ऑनलाईन त्याचा मागोवा घेऊ शकतो.
एका शेतकऱ्याचा अनुभव
अक्कलकुवा तालुक्यातील रमेश पावरा हे छोटे शेतकरी त्यांना जमिनीच्या नोंदणीसाठी अर्ज करायचा होता. पूर्वी, ते अनेकदा तहसील कार्यालयात गेले, पण प्रत्येक वेळी नवीन कारण मिळायचं “फाईल हरवली आहे”, “सही बाकी आहे”, “अजून पुढे गेली नाही.” यंदा त्यांनी अर्ज दिला आणि तो ई-ऑफिसवर टाकला गेला. दोन दिवसांनी गावातील कॉमन सर्व्हिस सेंटरवरून त्यांनी लॉगिन करून पाहिलं, फाईल तहसीलदारांकडे पोहोचली होती. आणखी काही दिवसांत मंजुरीही मिळाली. त्यांच्या डोळ्यांत समाधान होतं. ते म्हणाले, “पूर्वी माझा अर्ज लालफितीच्या डोंगरात अडकायचा, आता तो बुलेट ट्रेनच्या गतीने पुढे जातो.” ही केवळ रमेशची यांची कथा नाही, ती नंदुरबारच्या नव्या गतिमान प्रशासनाची ओळख आहे.
कामकाजातील बदल
ई-ऑफिसमुळे महसूल, आरोग्य आणि शिक्षण या तिन्ही प्रमुख विभागांत गती आली आहे. महसूल विभागात नामांतरण, वारसा आणि जमिनीच्या नोंदी आता काही दिवसांत पूर्ण होतात. पूर्वी हेच काम महिनोमहिने अडकायचं. जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषध खरेदीचे प्रस्ताव, डॉक्टरांच्या नियुक्तीची कागदपत्रं आणि शासकीय पत्रव्यवहार सर्व आता ई-ऑफिसवरूनच प्रक्रिया होतात. मंजुरीसाठी लागणारा वेळ निम्म्यावर आला आहे. शिक्षण विभागात शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव, शिक्षक बदल्यांचे अर्ज, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती सर्वकाही डिजिटल झालं आहे. शाळांना निधी वेळेत मिळतो आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विलंब न होता मिळते.
दुर्गम भागातील डिजिटल पहाट
नंदुरबारचा भूगोल कठीण आहे. धडगाव, शहादा आणि अक्कलकुवा यांसारख्या तालुक्यांतील अनेक पाडे अजूनही डोंगरमाथ्यावर वसलेले आहेत. इथे वीजपुरवठा आणि नेटवर्क या दोन्ही अडचणी कायम आहेत. प्रशासनाने या अडचणींवर उपाय शोधत प्रत्येक कार्यालयाला ई-ऑफिसशी जोडण्याचं काम केलं. अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं, तांत्रिक सुविधा निर्माण केल्या आणि कर्मचारीवर्गाला बदलासाठी तयार केलं. आज डोंगराच्या पायथ्याशी राहणारा शेतकरी आपला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचताना पाहतो. त्याच्यासाठी हा केवळ तांत्रिक बदल नाही, तर लोकशाहीचा नवा अनुभव आहे.
पारदर्शकता आणि जबाबदारी
ई-ऑफिसचं सर्वात मोठं यश म्हणजे पारदर्शकता. फाईल कुठे आहे, कोणाकडे आहे, किती दिवसांपासून आहे, हे सर्व प्रणालीवर स्पष्ट दिसतं. त्यामुळे जबाबदारी ठरते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो. पूर्वी फाईल हरवली की दोष ठरवणं कठीण होतं.आता प्रणाली स्वतःच नोंदी ठेवते. यामुळे प्रशासन अधिक जबाबदार आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. जिल्हा प्रशासनाने ‘कागदविरहित कार्यालय’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. कागदांचा वापर घटला आहे, छपाईचा खर्च कमी झाला आहे आणि पर्यावरणालाही फायदा झाला आहे.
नागरिकांच्या जीवनातील बदल
ई-ऑफिसचा परिणाम केवळ कार्यालयांपुरता मर्यादित राहिला नाही, तो थेट नागरिकांच्या जीवनात दिसतो. पेन्शनधारक वृद्धांना त्यांचा अर्ज वेळेत मंजूर होतो. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळते. शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे योग्य वेळी मिळतात. “फाईल हरवली” हे वाक्य आता इतिहास झाले आहे. लोक हसून म्हणतात, “फाईल पुढे गेली आहे.” हा बदल शांत आहे, पण प्रभावी आहे.
आव्हाने आणि शिकलेले धडे
ई-ऑफिसचा प्रवास सहज नव्हता. काही कर्मचाऱ्यांना नव्या प्रणालीबद्दल भीती वाटली. तांत्रिक त्रुटी आल्या, इंटरनेट मंद होतं, काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित होत असे. पण, प्रशासनाने सातत्य आणि संयम ठेवला. कर्मचाऱ्यांना वारंवार प्रशिक्षण दिलं, अडचणी समजून घेतल्या आणि त्यावर एकत्रित उपाय शोधले. काही वर्षांतच सर्व कार्यालयांनी या प्रणालीला स्वीकारलं. या अनुभवाने दाखवून दिलं की इच्छाशक्ती असेल, तर कोणताही बदल शक्य आहे. आणि जेव्हा त्या बदलाच्या मागे नागरिकांचा विश्वास असतो, तेव्हा तो टिकून राहतो.
नव्या युगाची सुरुवात
ई-ऑफिस ही फक्त प्रणाली नाही, ती शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा आहे.ती वेळ वाचवते, खर्च कमी करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास निर्माण करते. नंदुरबार जिल्ह्याने हा प्रयोग यशस्वीपणे राबवला आहे. आज प्रत्येक विभागात कामकाज गतीमान झालं आहे. अधिकाऱ्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती सहज उपलब्ध होते. नागरिकांनाही आपल्या प्रकरणाची स्थिती जाणून घेणं सोपं झालं आहे. प्रशासन आता केवळ फाईलींचं नाही, तर लोकांच्या अपेक्षांचं प्रशासन बनलं आहे.
ई-ऑफिसचा पुढचा अध्याय
ई-ऑफिसचा प्रवास फक्त नंदुरबारपुरता नाही. तो त्या महाराष्ट्राचा आरसा आहे जो हळूहळू कागदांवरून स्क्रीनवर जात आहे. राज्य सरकारने “पेपरलेस सचिवालय” हे ध्येय ठेवलं आहे, आणि जिल्ह्यांची कामगिरी त्या दिशेने आशादायक आहे. पुढील काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा विश्लेषण यांचा वापर ई-ऑफिसमध्ये वाढेल. फाईल फक्त डिजिटल न राहता स्मार्ट बनेल ती स्वतः पुढचा टप्पा ओळखेल, निर्णयप्रक्रियेत मदत करेल, आणि विलंब झाल्यास स्वयंचलित सूचना देईल. नंदुरबारसारख्या जिल्ह्यांनी या बदलाचं नेतृत्व केलं तर ग्रामीण भारताचं प्रशासनही डिजिटल युगात उभं राहील.
नवी कार्यसंस्कृती
ई-ऑफिस ही केवळ सॉफ्टवेअर प्रणाली नाही, तर एक नवी कार्यसंस्कृती आहे जबाबदारी, पारदर्शकता आणि वेळेच्या मूल्याची संस्कृती. या प्रणालीने प्रशासनातील मानवी संवेदनांना नवी उंची दिली आहे. जेव्हा एखाद्या वृद्धाला पेन्शन वेळेत मिळते, तेव्हा ती फक्त फाईल पूर्ण झाल्याची नोंद नसते, तर त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान प्रशासनाच्या मानवतेचं प्रतीक असतं.
ई-ऑफिस प्रणालीचा प्रवास म्हणजे कागदांच्या ढिगाऱ्यांमधून डिजिटल प्रकाशाकडे नेणारी वाट. तो प्रवास फक्त तांत्रिक बदलांचा नाही, तर लोकशाहीला नवा श्वास देणारा आहे. नंदुरबारचा अनुभव सांगतो की तंत्रज्ञान हे कुणाची मक्तेदारी नाही; ते डोंगर, पाडे आणि शेतीमध्येही तितक्याच ताकदीने रुजू शकतं.
आज “फाईल हरवली” हे वाक्य इतिहास आहे, आणि “फाईल एका क्लिकवर” ही वास्तवाची नवी ओळख. कदाचित काही वर्षांनी आपण मागे वळून पाहू तेव्हा लक्षात येईल की, ई-ऑफिस ही केवळ संगणक प्रणाली नव्हती तर ती भारताच्या लोकशाहीच्या नव्या अध्यायाचं पहिलं पान होती.
०००
- रणजितसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार