मुंबई, दि. ८ : ग्रामीण भागातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काम करणाऱ्या हातपंप कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
हातपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री पाटील बोलत होते. बैठकीस आमदार सुधीर मुनगंटीवार, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, सहसचिव गीता कुलकर्णी उपस्थित होत्या. तर चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि हातपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
बैठकीत चंद्रपूर जिल्हा तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कार्यरत हातपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. हातपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांसंदर्भात सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यात येईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतन, पेन्शन, सेवा अटी आदींबाबतच्या अडचणी मांडल्या. त्या सर्व बाबींसंदर्भात सखोल विचार करून कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
०००
राजू धोत्रे/विसंअ/