Pune | Fri, 10 October 2025

Ad

जागतिक दर्जाचे ‘कन्व्हेन्शन सेंटर’ नागपुरात उभारण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunil Goyal | 3 views
जागतिक दर्जाचे ‘कन्व्हेन्शन सेंटर’ नागपुरात उभारण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १० : नागपुरात सर्व सोयी सुविधायुक्त जागतिक दर्जाचे ‘कन्व्हेन्शन सेंटर’ उभारण्यात येणार आहे. याबाबत स्पेन येथील फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसमवेत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरला उभारण्यात येणारे ‘कन्व्हेन्शन सेंटर’ साठी निवडण्यात येणारी जागा सर्व परिवहन सेवांनी उत्तमरित्या जोडलेली असावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

यावेळी स्पेनचे भारतातील राजदूत जुआन अँटेनियो, फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड झेपाटेरो, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, पायोनियर एक्झिबिशन अँड कॉन्व्हेन्शन प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अरोरा आणि उपाध्यक्ष जीत अरोरा, नागपूर जिल्हाधिकारी विपिन इटनकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नागपुरात प्रस्तावित असलेले कन्व्हेन्शन सेंटर केवळ प्रदर्शने, कार्यक्रम आदींसाठी उपयोगात येणारे नसावे, तर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी हक्काचे व्यासपीठ असावे. नागपूरचा इतिहास ‘कन्व्हेन्शन सेंटर’ च्या माध्यमातून येथे आलेल्या प्रत्येकाला कळावा, अशा पद्धतीने कन्व्हेन्शन सेंटरची अंतर्गत रचना असावी. हे सेंटर अत्यंत आकर्षक, आधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त आणि पर्यावरण पूरक वास्तूचे मूर्तिमंत उदाहरण ठरावे.

स्पेनचे राजदूत म्हणाले, भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ यांच्यात चांगले संबंध आहेत. यामुळे दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होत आहे. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सामान्य नागरिकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणत असून याची दखल जगाने घेतली आहे. मुंबई हे भारताचेच नव्हे, तर दक्षिण आशियाचे ‘पावर हाऊस’ बनत आहे. त्यामुळे मुंबई राजधानी असलेल्या महाराष्ट्रसोबत नक्कीच स्पेनला काम करायला आवडेल, अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्राचा गौरव केला.

फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड झेपाटेरो यांनी सादरीकरण केले. यावेळी जिल्हाधिकारी नागपूर आणि फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसोबत सामंजस्य कराराचे आदान प्रदान करण्यात आले.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp