अहिल्यानगर, दि. १: जामखेड तालुक्यातील वंजारवाडी, जवळका, धनेगाव, पिंपरखेड, गिरवली व चोंडी या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली.
अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते व दळणवळणाचे मार्ग पाण्याखाली गेल्याने वंजारवाडीपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. या परिस्थितीत प्रा. शिंदे यांनी ट्रॅक्टरवर बसून गावातील नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्याने तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम झाल्याने ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या समस्या त्यांनी थेट ऐकून घेतल्या.
जवळका येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. धनेगावमध्ये शेतकरी बांधवांनी पिकांचे नुकसान, जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता, पाणी व वीज पुरवठा यासंबंधी निर्माण झालेल्या अडचणींविषयी सविस्तर माहिती दिली. पिंपरखेड व गिरवली परिसरातील नागरिकांनी व्यक्त केलेल्या तातडीच्या गरजाही ऐकून घेण्यात आल्या. चोंडी येथे सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घरकुल व पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.
या संपूर्ण पाहणीदरम्यान ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून शासन तातडीने आवश्यक मदत उपलब्ध करून देईल, अशी हमी प्रा. शिंदे यांनी दिली. शेतकरी व नागरिकांच्या समस्यांचे निवारण करून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने प्रयत्न होतील, असे त्यांनी सांगितले.
या दौऱ्यात जामखेड तालुक्यातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००