Pune | Thu, 09 October 2025

Ad

झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यास शासन सहकार्य करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunil Goyal | 6 views
झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यास शासन सहकार्य करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ०६ : अनेक दशकांचा वारसा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचा वाटा असलेल्या झवेरी बाजार परिसराला रत्न आणि आभूषण उत्सवामुळे सध्या नवे रूप आले आहे. या बाजार परिसराची पुनर्रचना आणि सुशोभीकरण करण्यासाठी झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशनने पुढाकार घ्यावा, राज्य शासनाच्या यंत्रणा त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईच्या ऐतिहासिक दागिने बाजाराचे वैभव, परंपरा आणि आर्थिक महत्त्व पुन्हा प्रदर्शित करण्यासाठी झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने प्रथमच ‘झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिव्हल 2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव 22 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला असून 6 ते 16 ऑक्टोबर 2025 दरम्यान चालणाऱ्या मुख्य प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झवेरी बाजार परिसरात झाले. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष हितेश जैन, सचिव किशोर जैन यांच्यासह ज्वेलरी क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, झवेरी बाजार हा भारतीय रत्न व दागिने उद्योगाचा कणा असून, येथील कारागिरीला जगभरात मान्यता आहे. काळानुसार अडचणी असूनही झवेरी बाजाराने आपली परंपरा व वैभव टिकवले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून येथील व्यापाऱ्यांना जागतिक स्तरावरील व्यापाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भारताच्या निर्यात क्षेत्रात या उद्योगाचा मोठा वाटा असून व्यावसायिकांनी आपल्या क्षमता वाढवत न्याव्यात, या उद्योगाचे अर्थव्यवस्थेतील योगदानही वाढतच राहील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेहमी अडचणींमध्ये संधी शोधण्याची प्रेरणा देतात, त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर कितीही अडचणी आल्या तरीही रत्न व दागिन्यांच्या बाजाराचे महत्त्व कधीही कमी होणार नाही, उलट भविष्यात तो अधिक विस्तारेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशन आणि इंडिया गोल्ड मेटाव्हर्सदरम्यान यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार व्यापारामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यापार अधिक सक्षम करण्यात येणार आहे. या कराराचेही मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. झवेरी बाजाराला प्रदर्शनाच्या रूपात साकारण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सांगून संपूर्ण परिसरच एका प्रदर्शन क्षेत्रात रूपांतरित झाला आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमात पारंपरिक सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि आधुनिक सजावटीचे दर्शन घडविण्यात आले आहे. लोकमान्य टिळक, सावित्रीबाई फुले, विविध देवींच्या नावाने असलेली प्रवेशद्वारे, राम मंदिराची भव्य प्रतिकृती अशा विषयांवर आधारित सजावट करण्यात आली आहे, याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयोजकांचे कौतुक केले.

रत्न आणि आभूषण क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिलेल्या उद्योजकांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष हितेश जैन यांनी या उत्सवासाठी राज्य शासन, पर्यटन विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp