यवतमाळ, दि. 9 (जिमाका) : पीकनुकसान भरपाईचे वितरण करण्यासाठी संबंधित खातेदारांच्या याद्या दोन दिवसांत अपलोड करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पुसद येथे दिले.
पुसद येथील श्री शिवाजी विद्यालय येथे नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईचे अनुदान मदत वाटपाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बुधवारी सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिका-यांनी यावेळी पीकनुकसान भरपाईचे अनुदान वाटपाच्या वैयक्तिक व सामुहिक खातेदारांच्या बँक खाते क्रमांकासह याद्या पोर्टलवर अपलोड करण्याबाबत गावनिहाय आढावा घेतला. त्यात 50 टक्क्यांहून कमी काम असलेल्या गावांच्या याद्या तात्काळ अपलोड करण्याचे निर्देश दिले.
गावनिहाय वैयक्तिक व सामुहिक खातेदारांच्या बँक खाते क्रमांक व संमतीपत्रासह याद्या तयार करुन कोणत्याही परिस्थितीत दोन दिवसांत यादी अपलोड करण्याचे निर्देश दिले. तसेच, कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी शेतक-यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होईल व पात्र लाभार्थी लाभापासुन वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, तहसीलदार महादेव जोरवर, गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड,, तालुका कृषी अधिकारी श्री. मुकाडे, तसेच पुसद तालुक्यातील मंडळ अधिकारी महसूल, मंडळ कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, ग्राम विकास अधिकारी हे उपस्थित होते.
000