मुंबई, दि. ७ : जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी वर्षभराचे संपूर्ण वेतन रुपये ३१ लाख १८ हजार २८६ इतक्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
राज्यात मुसळधार पाऊस व महापुरामुळे शेती आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाधित नागरिकांना मदत पुरविण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतःचा वर्षभराचा पगार मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून डिसेंबर २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीतील संपूर्ण वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहे.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून त्यांनी जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेऊन राज्य शासन शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची हमी त्यांनी या आपत्तीग्रस्तांना दिली. राज्यात मुसळधार पावसामुळे आणि महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या आपत्तीग्रस्तांना शासन मदत करत आहे. शासनाच्या मदतीसोबत गिरीश महाजन यांनी वर्षभराचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहे.
००००००
एकनाथ पोवार/विसंअ/