मुंबई, दि. ४: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ बहुगुणी अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाने सिने जगताची मोठी हानी झाली असून अजरामर अभिनय–नृत्यकलेचा तेजस्वी प्रवास संपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करत संध्या शांताराम यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंवेदना व्यक्त करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, अभिनय व नृत्य या दोन्ही क्षेत्रांतील त्यांची कला भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मौल्यवान ठेवा ठरली आहे. पिंजरा, नवरंग अशा मराठी चित्रपटांतील त्यांच्या गाजलेल्या भूमिका तसेच हिंदी सिनेसृष्टीतील योगदान अविस्मरणीय आहे. विशेषतः दो आंखें बारह हाथ या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने व नृत्यकलेने प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
अभिनय, नृत्यकला आणि भावपूर्ण अभिव्यक्ती यांचा सुंदर संगम त्यांच्या भूमिकांमध्ये होता. त्यामुळे त्यांच्या भूमिका कायम अजरामर राहतील. त्यांच्या चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालणाऱ्या संध्या शांताराम रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य करतील, अशा शब्दांत भावना व्यक्त करत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.