मुंबई, दि. ५: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत (लिडकॉम) मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात चर्म उत्पादनांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.
देशभ्रतार म्हणाल्या, दि.२९ सप्टेंबर ते दि. १ ऑक्टोंबर, २०२५ या कालावधीत प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी भेट दिली. तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे व आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांनी या प्रदर्शनासाठी मार्गदर्शन केले. राज्यात चर्मोद्योगाचा विकास करुन चर्मोद्योगातील कारागिरांचा व तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि चर्मवस्तू व पादत्राणे उत्पादनाकरिता बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, तसेच चर्मोद्योगास प्रोत्साहन देऊन त्याच्या विकासाला चालना देणे हे या महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. राज्यात या महामंडळाची चार उत्पादन केंद्रे असून सहा ठिकाणी चर्मवस्तू व पादत्राणांची विक्री केंद्रे आहेत. महामंडळातर्फे उत्पादीत केल्या जाणाऱ्या राज्यातील चर्मकार समाजातील कारागिरांनी तयार केलेल्या चर्मवस्तू व पादत्राणांना आणि विशेष करुन कोल्हापुरी चपलांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, त्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच कारागिरांना बाजारपेठ मिळावी यादृष्टीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे देशभ्रतार यांनी सांगितले.
०००