Pune | Sun, 02 August 2026

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे विचार सामाजिक समता आणि न्यायाची प्रेरणा देणारे : मंत्री छगन भुजबळ

Sunil Goyal | 6 views
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे विचार सामाजिक समता आणि न्यायाची प्रेरणा देणारे : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. 1 ऑगस्ट 2026 (जिमाका वृत्तसेवा): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ साहित्यनिर्मिती नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. श्रमिक, वंचित, दलित, भटके-विमुक्त, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या वेदनांना त्यांनी आपल्या लेखणीतून आवाज दिला. श्रमाला प्रतिष्ठा, सामाजिक समता आणि अन्यायाविरुद्ध संघर्षाची प्रेरणा देणारे त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

महाकवी कालिदास कलामंदिर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात तसेच त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मंत्री श्री भुजबळ बोलत होते.

यावेळी राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके – आहेर, आमदार देवयानी फरांदे, आमदार हिरामण खोसकर, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, उत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी महापौर विनायक पांडे, उप महापौर विलास शिंदे, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, रंजन ठाकरे नगरसेवक शाहू खैरे, अदिती पांडे, शांताराम शेलार, मयुरी पवार, सुधाकर बडगुजर, वास्तु विशारद दीपक वाघ, शाम लोंढे, शिल्पकार श्री.पाटील, विश्वास कांबळे, अंबादास अहिरे यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांचे आयुष्य अल्प असले तरी त्यांनी उभे केलेले साहित्यविश्व आणि सामाजिक कार्य चिरंतन आहे. त्यांनी ३५ हून अधिक कादंबऱ्या, असंख्य कथा, पोवाडे, लावण्या, लोकनाट्ये आणि गीतांची निर्मिती केली. ‘फकीरा’ ही त्यांची कादंबरी अन्यायाविरुद्ध संघर्षाचे प्रतीक ठरली. या साहित्याद्वारे त्यांनी वंचित समाजाला अन्यायाविरोधात उभे राहण्याची प्रेरणा दिली. त्यांचे साहित्य केवळ कल्पनारम्य नसून सामान्य माणसाच्या जगण्यातील वास्तवाचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या साहित्याचे रशियनसह अनेक परदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले आणि जागतिक स्तरावर त्यांच्या प्रतिभेची दखल घेण्यात आली.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरी, पोवाडे आणि लोककलेच्या माध्यमातून जनजागृती केली. शाहीर अमर शेख, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासमवेत त्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. “माझी मैना गावावर राहिली” यासारख्या पोवाड्यांमधून त्यांनी सामान्य जनतेच्या भावना आणि संघर्ष प्रभावीपणे मांडला. श्रमाला प्रतिष्ठा, माणसाला सन्मान आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा स्वीकार करून समताधिष्ठित समाज निर्माण करणे, हीच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना खरी अभिवादन ठरेल, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा समाज परिवर्तनासाठी प्रेरणादायी –  मंत्री गिरीश महाजन

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाला स्वाभिमान, संघर्ष व सामाजिक परिवर्तनाची दिशा देणारे क्रांतिकारी विचारवंत होते. त्यांच्या विचारांचा वारसा समाज परिवर्तनासाठी प्रेरणादायी असून महापुरुषांना कोणत्याही जाती-समाजाच्या चौकटीत न पाहता त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी महानगरपालिका व राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून भव्य पूर्णकृती पुतळा उभारण्यात आला आहे. मातंग समाजातील महिलांच्या सन्मानजनक पुनर्वसनासाठी महानगरपालिकेमार्फत नियमित मानधन योजना राबविण्याची आवश्यकता आहे. मातंग समाजाच्या वस्त्यांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता तसेच शौचालय आदी मूलभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यात आली असून उर्वरित विकासकामेही प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत. समाजाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच सन्मानजनक पुनर्वसनालाही तितकेच महत्त्व देण्याची गरज आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शिल्पकार होते. त्यांनी आपल्या लेखणीतून वंचित घटकांना नवी दिशा दिली, समाजात जागृती

निर्माण केली आणि समतेचा संदेश दिला. त्यांच्या साहित्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असून आजही त्यांचे विचार तितकेच समकालीन आहेत. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षणाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे. समाजातील प्रत्येक मुलगा-मुलगी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन सक्षम नागरिक बनावा, यासाठी शासन विविध शैक्षणिक व कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा जोतिराव फुले या महापुरुषांनी संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केले आहे. त्यांचे विचार आणि कार्य सर्व समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांचा वारसा एकात्मतेने पुढे नेणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यातून प्रेरणा घेत शिक्षण, सामाजिक समता, बंधुभाव आणि राष्ट्रहिताची मूल्ये अधिक दृढ करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन करून मंत्री महाजन यांनी केले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे एका समाजापुरते मर्यादित नसून सर्व समाजघटकांना समानतेचा आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे महान साहित्यिक होते. त्यांच्या विचारांचे जतन आणि त्यानुसार कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्यरत्न लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष विनायक पांडे यांनी प्रास्ताविक केले. आभार शाहू खैरे यांनी मानले.

आमच्यात सामील व्हा