Pune | Thu, 09 October 2025

Ad

मॅग्नेट २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीतून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी चालना मिळेल – पणनमंत्री जयकुमार रावल

Sunil Goyal | 3 views
मॅग्नेट २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीतून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी चालना मिळेल – पणनमंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पाच्या (मॅग्नेट) अंमलबजावणीला आशियाई विकास बँकेचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला असून मॅग्नेट २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी चालना मिळेल, असा विश्वास पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा मॅग्नेट सोसायटीचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

आशियाई विकास बँकेच्या संचालक मंडळाच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या १३ सदस्यीय शिष्टमंडळाबरोबर नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यावेळी मंत्री रावल बोलत होते. एडीबीच्या निम दोरजी, वेहुआ ल्यू, श्रीमती सुपाक चायवावान, श्रीमती माझा सुवेर्ड्रुप, श्रीमती हारुका सेकीया, पोन्नुराज वेल्लुसामी, श्रीमती लोईस नाकारीयो, श्रीमती मियो ओका, कायवी यो, के.मुरुगाराज, क्रिशन रौटेला, के.बालाजी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. या दौऱ्यात फलोत्पादन क्षेत्रातील उपक्रमांचा आणि मॅग्नेट प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या मूल्यसाखळी विकासाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या वित्त व्यवहार विभागाचे अवर सचिव योमेश पंत, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार व मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, राजगोपाल देवरा आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम उपस्थित होते.

पणन मंत्री रावल म्हणाले की, राज्यातील फलोत्पादन क्षेत्रातील विकास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि कृषी मूल्य साखळी बळकट करण्याच्या उद्देशाने मॅग्नेट प्रकल्पाची अंमलबजावणी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत करण्यात येत आहे. आशियाई विकास बँक आणि राज्य शासन यांच्या सहकार्याने हा प्रकल्प २०२१-२२ ते २०२७-२८ या कालावधीत राबविण्यात येत असून त्याचा वित्तीय आराखडा १४२.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतका आहे.

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील प्रमुख १४ फळपिके आणि सर्व प्रकारच्या फुलांसाठी उत्पादन ते ग्राहकांपर्यंत एकात्मिक मूल्य साखळी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पामध्ये शेतकरी उत्पादक संस्था, निर्यातदार, प्रक्रिया उद्योग, लघु व मध्यम उद्योजक, स्वयंसहाय्यता गट आणि वित्तीय संस्था यांचा सक्रिय सहभाग आहे. मॅग्नेट प्रकल्पामुळे राज्यात गुंतवणूक, मूल्यवर्धन आणि रोजगार निर्मितीला चालना मिळाली आहे. मॅग्नेट २.० या विस्तारित टप्प्यांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, आधुनिक तंत्रज्ञान, पॅकेजिंग-ब्रॅंडिंग, कार्बन क्रेडिट्स, समृद्धी महामार्गावरील कृषी कॉरिडॉर आणि संस्था बळकटीकरण या घटकांचा समावेश असलेला आराखडा आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात येणार असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले. त्याचबरोबर आशियाई विकास बँकेने महाराष्ट्रासाठी सातत्याने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत भविष्यातील भागीदारी अधिक मजबूत करण्याचा विश्वास व्यक्त केला.

बैठकी दरम्यान प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी व उद्योजकांना मिळणारे आर्थिक साहाय्य, तांत्रिक मार्गदर्शन, पायाभूत सुविधा उभारणी आणि बाजारपेठेतील प्रवेश याबाबत सविस्तर चर्चा झाली. आशियाई विकास बँकेच्या शिष्टमंडळाने महिला सक्षमीकरणासाठी मॅग्नेट प्रकल्पाचे योगदान विशेष अधोरेखित करत समाधान व्यक्त केले. दौऱ्यादरम्यान शिष्टमंडळाने नवी मुंबईतील मे. एस.आर.पी. ओव्हरसीज या एकात्मिक मूल्य साखळी प्रकल्पाला भेट दिली. पॅकहाऊस व निर्यातसुविधांची पाहणी करून त्यांनी मिरची व चिकू निर्यातीतील प्रगतीची माहिती घेतली. नवी मुंबई येथे झालेल्या चर्चासत्रात राज्यातील विविध भागांतील १२ संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. संचालक मंडळाने त्यांच्याशी संवाद साधून प्रकल्पाच्या उपयुक्ततेबाबत समाधान व्यक्त केले आणि भविष्यातील योजनांबाबत सूचना मागविल्या.

०००००

बी.सी.झंवर/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp