नागपूर, दि.०६: नागरिकांच्या सुविधांना अधिकाधिक प्राधान्य देऊन शासकीय सेवेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी शासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. सचिव पातळी, राज्यपातळीवर वेळोवेळी याबाबत आढावा घेऊन जास्तीत जास्त नागरिकांना उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा ही भूमिका राहिली आहे. याला छेद देत काही कार्यालयांबाबत नागरिकांच्या असलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन आज खामला येथील सह दुय्यम उपनिबंधक वर्ग- २ कार्यालयाला अचानक भेट देऊन पाहणी करावी लागली, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
खामला भागातील सह दुय्यम उपनिबंधक वर्ग-२ कार्यालयाबाबत आलेल्या गंभीर तक्रारीची दखल घेऊन महसूलमंत्री बावनकुळे यांनी आज दुपारी थेट या कार्यालयात अनपेक्षित भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत एका अधिकाऱ्याच्या टेबलमधील ड्रॉवरमध्ये रोख रक्कम आढळून आली. याबाबत त्यांनी पोलिसांना योग्य तो तपास करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना जर कोणत्याही शासकीय कामासाठी कोणी लाच अथवा इतर कशाची मागणी केल्यास थेट तक्रार करण्याचे आवाहन महसूलमंत्री बावनकुळे यांनी केले.
यावेळी मंत्री बावनकुळे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, भ्रष्टाचाराविरुद्ध सरकारची शून्य-सहिष्णुतेची भूमिका आहे. कुणीही नागरिकांकडून लाच मागितल्यास न घाबरता तक्रार करा. पारदर्शक प्रशासन हेच आमचे ध्येय आहे. राज्यात महसूल विभाग अधिक जबाबदार आणि जनतेसाठी सुलभ करण्यासाठी पुढील काही दिवसांत सर्व उपनिबंधक कार्यालयांवर विशेष तपास मोहिमा राबविण्याचे संकेत त्यांनी दिले.
०००