ठाणे,दि. १० (जिमाका): महसूल विभाग शासनाचा चेहरा असून अधिक जबाबदारी आणि पारदर्शकपणे विभागाने काम करावे, अशी अपेक्षा अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी व्यक्त केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाची आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी खारगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांना भेट देऊन शाखाप्रमुखांशी संवाद साधला. या बैठकीत त्यांनी 150 दिवसांचा कार्यक्रम आणि त्यांतर्गत केलेले काम (ई-गव्हर्नन्स आणि सेवाकर्मी), सेवा पंधरवडामध्ये झालेले काम, जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेले नवीन उपक्रम आणि त्यांची प्रगती, महत्त्वाच्या महसूल बाबी आणि त्यांची स्थिती, प्रमुख प्रकल्पांचे भूसंपादन, आरओ बैठकीच्या ईक्यूजेशी संबंधित मुद्दे, वाळूची उपलब्धता आणि कृती, उत्परिवर्तन, अॅलग्रीस्टॅक आदी विषयांचा आढावा घेतला.
यावेळी खारगे म्हणाले की, समाजाची सेवा करण्यासाठी शासकीय नोकरी हे एक महत्त्वाचे क्षेत्र असून आपण प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली पाहिजे. महसूल विभाग हा शासनाचा चेहरा आहे. ठाणे महसूल विभागाने कोणती कामे केली आहेत व कोणती कामे करणार आहेत, हे जनतेपर्यंत पोहोचविले पाहिजे. महसूल विभागाने लोकांसाठी अधिक जबाबदारीने, पारदर्शक व विश्वासार्हपणे काम केले पाहिजे. महाराष्ट्राचे नाव देशातच नाही तर जगामध्ये घेतले जाते. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योजक गुंतवणूक करीत आहेत. आपले राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. त्याप्रमाणेच ठाण्यातही गुंतवणूकीला वाव आहे.
महसूल विभाग शासनाचा प्रतिनिधी आहे. लोकांना न्याय मिळेल, अशी विश्वासार्हता निर्माण करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी सर्व विभागांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. सर्व महसूल विभागात ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावीपणे वापर झाला पाहिजे. लोकांची कामे गतिमानतेने होतील, महसूल विभागावर जनतेचा विश्वास वाढेल, राज्याची प्रगती होईल, अशी सेवा आपण सर्वांनी मिळून करायाची आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या बैठकीस अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सर्जेराव मस्के पाटील, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.
०००