Pune | Thu, 09 October 2025

Ad

मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताचा वेग आणि विकास अधोरेखित – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Sunil Goyal | 6 views
मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताचा वेग आणि विकास अधोरेखित – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी मुंबई, दि. ८ : आजचा दिवस केवळ प्रकल्पांच्या उद्घाटनाचा नव्हे, तर भारताच्या झपाट्याने होत असलेल्या परिवर्तनाचे आणि प्रगतीच्या दिशेने घेतलेल्या ठोस पावलांचे प्रतीक आहे. मुंबईतील विविध प्रकल्पांमुळे देशाचा वेग आणि विकास अधोरेखित झाला आहे. पायाभूत सुविधांतील गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी हे विकसित भारताच्या दिशेने टाकलेले मजबूत पाऊल असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, मुंबई मेट्रो लाईन-३ च्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या अंतिम टप्प्याचे राष्ट्राला अर्पण, ‘मुंबई वन’या देशातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी अॅपचा शुभारंभ तसेच राज्यातील ४१९ आयटीआय आणि १४१ तांत्रिक संस्थांमध्ये २ हजार ५०६ बॅचेसच्या माध्यमातून नवीन अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचा शुभारंभ झाला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, जपानचे भारतातील राजदूत ओनू केईची, वन मंत्री गणेश नाईक, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, लोकसभा सदस्य श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, खासदार नरेश म्हस्के, खासदार धैर्यशील पाटील, आमदार सर्वश्री रवींद्र चव्हाण, अमित साटम, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विक्रांत पाटील, मंदाताई म्हात्रे, अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्यासह लोकप्रतिनिधी व विविध मान्यवर उपस्थित होते.

लोकनेते दि. बा. पाटील यांचे काम प्रेरणादायी – प्रधानमंत्री

मराठीतून भाषणाची सुरूवात करून प्रधानमंत्री मोदी यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे पुत्र, लोकनेते दि. बा. पाटील यांनी समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी ज्या सेवाभावी वृत्तीने काम केले ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवन समाजसेवेचे काम करणाऱ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील, असा दि. बा. पाटील यांचा गौरवपूर्ण उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला.

मुंबई मेट्रो आधुनिक भारताच्या गतिशीलतेचे प्रतीक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, मुंबई शहराला आज एक ऐतिहासिक भेट मिळाली आहे. देशातील सर्वात गजबजलेल्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबईला पूर्णतः भूमिगत मेट्रो सेवा मिळाली आहे. या मेट्रो प्रकल्पामुळे, शहरातील लाखो प्रवाशांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर, जलद आणि सुरक्षित होणार आहे. मुंबईच्या हृदयात भूमिगत मेट्रो सेवा सुरू करणे हे एक अभूतपूर्व यश मानले जात आहे. ही मेट्रो सेवा केवळ मुंबईच्या विकासाचे प्रतीक नाही, तर ती आधुनिक भारताच्या गतिशीलतेचे देखील प्रतीक आहे. मुंबईतील प्रवास आता दोन-अडीच तासांऐवजी ३०-४० मिनिटांत पूर्ण होईल.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महाराष्ट्र आणि देशाची अभिमानास्पद ओळख

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देश आणि राज्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे डिझाईन कमळाच्या आकारात असून ते भारतीय संस्कृती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या विमानतळामुळे महाराष्ट्रातील शेतकरी, लघुउद्योग व निर्यातदार थेट युरोप, मध्यपूर्व यांच्यासह जागतिक बाजारपेठेशी जोडले जातील. त्याचा थेट फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला होणार आहे. राज्यातील फळे, भाजीपाला व मासे निर्यातीला युरोप व इतर देशात नवीन बाजारपेठ मिळेल. यामुळे नवीन गुंतवणूक आणि उद्योग वाढेल.

२०१४ मध्ये देशात केवळ ७४ विमानतळ होते. आज ही संख्या १६० च्या पुढे गेली आहे. उडान योजनेंतर्गत लाखो सामान्य नागरिकांनी प्रथमच विमान प्रवासाचा अनुभव घेतला आहे. भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक करणारा देश बनला आहे. विमान उत्पादक कंपन्यांकडे सध्या एक हजारहून अधिक नव्या विमानांच्या निर्मितीची मागणी आहे. त्यामुळे पायलट्स, इंजिनीअर्स, केबिन क्रू आणि देखभाल, दुरुस्ती व तपासणी (एमआरओ) सुविधांमुळे हजारो रोजगार संधी उपलब्ध होणार असून भारत हा ‘एमआरओ’ हब होणार आहे. त्याचबरोबर ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदरामुळे रोजगार वाढणार असल्याचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

तरुणांसाठी रोजगार, नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

पीएम सेतू योजनेद्वारे देशभरातील आयटीआय संस्थांना उद्योग क्षेत्राशी जोडले जात आहे. ७ हजार कोटी रुपयांच्या या योजनेंतर्गत ड्रोन, रोबोटिक्स, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहनांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. महाराष्ट्र सरकारने देखील राज्यातील शेकडो आयटीआय व तांत्रिक शाळांमध्ये अत्याधुनिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. यामुळे लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत, असेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी नमूद केले.

‘मुंबई वन अ‍ॅप’मुळे सुलभ वाहतूक अनुभव

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहेच, त्याचबरोबर सर्वाधिक व्हायब्रंट शहरापैकी हे एक शहर आहे. मुंबईतील वाहतुकीला गती देण्याचे काम होत आहे. देश ‘एक राष्ट्र, एक मोबिलिटी’ कडे जात असून त्या दृष्टीकोनातून ‘मुंबई वन’ अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांना एकाच तिकीटाद्वारे लोकल, मेट्रो, बसचा वापर करता येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. मुंबईकरांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्वदेशीचा आग्रह आणि आर्थिक स्वावलंबनाचा संदेश

वस्तू व सेवा करामधील बदलानंतर झालेल्या नवरात्रीतील विक्रमी खरेदीचा उल्लेख करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात टीव्ही, बाईक, रेफ्रिजरेटरची विक्रमी विक्री होत आहे. देशातील बाजारपेठ बळकट होत आहे. आपण सर्वांनी ‘स्वदेशी’चा स्वीकार करणे गरजेचे आहे. देशाच्या पैशाचा उपयोग देशातील कामगारांना, उद्योगांना आणि तरुणांना लाभदायक ठरेल. त्यामुळे देशवासियांनी स्वदेशीचा अंगीकार करून भारताच्या विकास प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी केले.

देशाच्या विकासाला गती देण्यास महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्राने विकासात आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, शहर आणि तरुण अधिक सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट आहे, असेही प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितले.

संपूर्ण देश विकसित भारताच्या संकल्पनेला जोडला जात आहे. लोकहित सर्वोपरी हे लक्षात ठेवून सर्व शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात विकासाचा वेग वाढत असून देशाची प्रगती लक्षात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रधानमंत्री मोदी यांचे नवी मुंबई विमानतळाची प्रतिकृती देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. शिवकर बापूजी तळपदे यांनी उडविलेल्या देशातील पहिल्या विमानाची प्रतिकृती देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री यांचे स्वागत केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रतिकृती असलेले मानचिन्ह देऊन गौतम अदानी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टच स्क्रीन द्वारे डिजिटल तोरणाने करण्यात आले. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी टर्मिनल इमारतीमधील सुविधांसह विमानतळाच्या त्रिमितीय रचनेची पाहणी केली.

यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू,  केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

०००

नंदकुमार वाघमारे/ बी.सी.झंवर/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp