मुंबई, दि. ०६ : सामान्य नागरिकांना सहकार विभागाशी संबंधित सेवा सहज आणि सुलभपणे उपलब्ध होण्यासाठी अधिकाधिक सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले. मल्होत्रा हाऊस येथे मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विभागाचा आढावा घेण्यात आला.
मंत्री पाटील म्हणाले, प्रशासकीय कामकाज ठरलेल्या वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. नागरिकांना वेळेत सेवा मिळाली पाहिजे, जेणेकरून त्यांना दिरंगाईमुळे हेलपाटे मारावे लागू नयेत, अनेक नागरिकांच्या विभागस्तरावरील तक्रारी थेट मंत्रालयात येत आहेत. आपल्या विभागातील कामकाजाचे कालबद्ध नियोजन करून नागरिकांच्या कामाला प्राधान्य द्यावे. ई-ऑफिस चा अधिकाधिक कामकाजात वापर करावा. त्यामुळे नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध होतील कामकाजात अधिक पारदर्शकता येईल. सर्व सहकारी संस्थांचे ऑडिट वेळेत झाले पाहिजे, असेही त्यांनी निर्देश दिले.
या बैठकीत विभागातील रिक्त पदांची स्थिती, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास प्रकरणांवरील कार्यवाही, प्रलंबित तक्रारी व प्राप्त अर्ज, सहकार संवाद आणि आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी, अवसायनातील नागरी सहकारी बँकांच्या कामकाजाचा आढावा, मानीव अभिहस्तांतरण आढावा, विभागीय सहनिबंधक यांच्याकडील प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीला विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील, जिल्हा उपनिबंधक, नितीन काळे, किरण सोनवणे, आनंद कटके, राजेश लव्हेकर मुंबई विभागातील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
०००
काशीबाई थोरात/विसंअ/