Pune | Fri, 10 October 2025

Ad

नियुक्त उमेदवारांनी शासनाचा व जनतेचा विश्वास संपादन करावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Sunil Goyal | 5 views
नियुक्त उमेदवारांनी शासनाचा व जनतेचा विश्वास संपादन करावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

शासकीय संस्थांच्या बळकटीकरणाला गती देऊ

सांगली, दि ४ (जि. मा. का.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक पदासाठी निवड झालेल्या तसेच अनुकंपा तत्त्वावर आज नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आलेल्या उमेदवारांनी प्रामाणिकपणे व जबाबदारीने लोकाभिमुख काम करून शासनाचा व जनतेचा विश्वास संपादन करावा, असे मार्गदर्शन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.

राज्य शासनाकडून महाराष्ट्रात एकाच दिवशी दहा हजारहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप अंतर्गत राज्य रोजगार मेळाव्याच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून दूरदृश्यप्रणालीद्वारे ते बोलत होते. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमास आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, डॉ. सुरेश खाडे आणि सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

नियुक्त उमेदवारांचे अभिनंदन करुन, शासकीय सेवेत त्यांचे स्वागत करून व चांगल्या कामासाठी त्यांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी दहा हजारहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचा राज्य शासनाचा हा महारोजगार मेळावा असून, असा कार्यक्रम राज्याच्या इतिहासात प्रथम होत आहे. शासनाच्या 150 दिवसाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमातून या कार्यक्रमाला गती मिळाली. यासाठी जिल्हाधिकारी यांना अधिकार दिले आहेत. यापुढेही प्रतीक्षासूची व रिक्त पदे यांचा वेळोवेळी आढावा घेऊ व अनुकंपा प्रवर्गातील उमेदवारांना न्याय देऊन शासकीय संस्थांचे बळकटीकरण करू. ही प्रक्रिया गतीने करण्यात येईल. ज्या तत्परतेने या नियुक्त्या करण्यात आल्या, त्याच तत्परतेने उमेदवारांनीही जबाबदारीने, शिस्तीने व प्रामाणिकपणे लोकाभिमुख काम करावे, असे त्यांनी सूचित केले.

यावेळी अनुकंपा तत्त्वावर गट क व गट ड मध्ये प्रत्येकी 39 व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या 61 अशा 139 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. शासकीय सेवेत असताना दुर्दैवाने मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.


यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी हा राज्य शासनाचा चांगला उपक्रम असून, यातून नियुक्त झालेल्या उमेदवारांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, राज्य शासनाच्या सेवेत आज दाखल झालेल्या उमेदवारांनी आपण शासन व जनता यातील दुवा म्हणून काम करणार आहोत, याची जाणिव कायम ठेवावी. शासकीय कामकाजात शासनाचे धोरण व कायद्याची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे कार्यालयीन शिस्त, प्रामाणिकपणा यातून तुमच्या कामात सकारात्मक प्रतिबिंब उमटवा. आज नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांनी त्यांच्या विभागाचे सर्व नियम, परिपत्रके, शासन निर्णय यांची माहिती करून घ्यावी. कालानुरूप अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करा. लोकाभिमुख प्रशासन केंद्रित कामकाज करण्याचे ध्येय ठेवून नियमानुसार काम करावे. राज्य शासनाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून नियुक्त कर्मचाऱ्यांच्या जीवनात आजच दिवाळी साजरी झाली असल्याचे ते म्हणाले.

पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, राज्य शासनाने या माध्यमातून सर्व विभागांतील रिक्त जागांवर भरती करत एक प्रकारे महारोजगार मेळावा आयोजित केला आहे. नियुक्त उमेदवारांनी प्रामाणिकपणे व चिकाटीने काम करावे. दिलेली जबाबदारी नीट पार पाडावी, असे सांगत त्यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित राज्य स्तरावरील मुख्य राज्य रोजगार मेळाव्याचे दूरदृष्यप्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदानाचा कार्यक्रम पार पडला.
रोपट्यास जल अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार अमोल कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, उमेदवार व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

राज्यभरात दहा हजारहून अधिक नियुक्तीपत्रे प्रदान

राज्य स्तरावरील मुख्य राज्य रोजगार मेळावा हा ऐतिहासिक सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तर प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्यक्रमांचे आयोजन करून नियुक्तीपत्रे दिली गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा नियुक्ती प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर, राज्यभरात शनिवारी 5 हजारहून अधिक उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत शिफारस करण्यात आलेल्या 5 हजारहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली गेली असून, या माध्यमातून एकाच दिवशी 10 हजारहून अधिक उमेदवार शासकीय सेवेत दाखल होत आहेत.
00000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp