Pune | Fri, 10 October 2025

Ad

नोकरीचा आधार कुटुंबासाठी मोठा – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

Sunil Goyal | 6 views
नोकरीचा आधार कुटुंबासाठी मोठा – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

जिल्ह्याचा नावलौकिक होण्यासाठी काम करा

चंद्रपूर, दि. ०४ : राज्यामध्ये अनुकंपाधारकांच्या नोकरीचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या कुटुंबांना आर्थिक व भावनिक मदत करणे ही शासनाची जबाबदारी आहे, या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरणात्मक निर्णय घेतला. त्यामुळेच आज संपूर्ण राज्यात एकाचवेळी अनुकंपाधारक व सरळसेवा भरती उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येत आहे. शेवटी नोकरी ही उपजिविकेचे साधन असून कुटुंबासाठी अतिशय मोठा आधार आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे अनुकंपाधारक व सरळ सेवा भरती उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोजगार उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडली आणि प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करत नियुक्तीपत्र देण्याचे नियोजन केले, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, आज चंद्रपूर जिल्ह्यातील 202 अनुकंपाधारक व 83 सरळसेवा भरती उमेदवार असे एकूण 285 जणांना शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यापूर्वी अनुकंपा या विषयासंदर्भात 40 शासन निर्णय होते. या सर्व शासन निर्णयांना एकत्रित करून अनुकंपाबाबत सुलभ धोरण तयार व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनव संकल्पना मांडली. त्यामुळेच आज अनेक कुटुंबांना शासकीय नोकरीचा आधार मिळाला आहे.

अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा प्रशासनाने अतिशय पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे तयार केली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यात अतिशय चांगले काम जिल्हा प्रशासन करत आहे. अनुकंपाधारक तसेच नवीन उमेदवारांनीही यात आपले योगदान देऊन निष्ठेने काम करावे. नोकरीत आपले ध्येय आणि उद्दिष्ट ठरवून नागरिकांची सेवा करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, शासनाच्या नवीन धोरणानुसार जिल्ह्यातील 202 अनुकंपाधारक व 83 लिपिक टंकलेखकांना आज नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात येत आहे. सर्व विभागातील रिक्त पदांची माहिती घेऊन एकत्र यादी तयार करण्यात आली. त्यानुसार कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. उमेदवारांसाठी हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. नवीन उमेदवारांनी आपल्या संपूर्ण क्षमतेने, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करावे, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन अजय मेकलवार यांनी तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी मानले. यावेळी सर्व विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करण्यासाठी काम करा – आमदार सुधीर मुनगंटीवार

कार्यक्रम अनेक होतात, मात्र आजचा कार्यक्रम नेहमी आठवणीत राहील, असा आहे. जगातील केवळ 28 देशात स्थायी नोकरी आहे. शासकीय नोकरी ही ईश्वराची सेवा आहे, असे समजून लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण होईल, या भावनेने काम करावे. आपल्या हातून कोणतीही चूक होता कामा नये. जे काम मिळेल त्या कामांमध्ये तज्ज्ञ होण्यासाठी प्रयत्न करावा, असे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

 अधिकारी आणि कर्मचायांनी चंद्रपूरचे नाव मोठे करावे आमदार किशोर जोरगेवार

राज्यात पहिल्यांदा एकाचवेळी 10309 उमेदवारांना शासकीय नेाकरीचे नियुक्तीपत्र देण्यात येत आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील 285 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी – कर्मचा-यांनी तसेच नवनियुक्त उमेदवारांनी चंद्रपूरचे नाव मोठे करावे, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. सरकारने अतिशय पारदर्शक पद्धतीने ही भरती केली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहील. शासकीय नोकरीत रुजू होणाऱ्या उमेदवारांनी अनेक नवीन नवीन गोष्टी शिकून घ्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप :  चंद्रपूर जिल्ह्यातील 202 अनुकंपाधारक आणि 83 सरळसेवा भरती उमेदवार, असे एकूण 285 जणांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यात मनिष दहिवले, सरिता मेश्राम, संदीप किटे, दिवेश भैसारे, समित्र कुमरे, राज सलामे, नम्रता करमळकर, राकेश आष्टेकर, प्रगती मार्लेवर, संतोष घाटोडे, शितल पाटोळे, शितल पुल्लावार, कविता उमरे, शिवम मडावी, कृष्णा सातपुते, विश्वास इटणकर, सिद्धेश तायडे, सरोज ब्राह्मणे, तन्वी सिडाम, यांच्यासह सेवा पंधरवडा अभियानातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच सर्वांसाठी घरे अंतर्गत आदेश वाटप, वन हक्क पट्टे वाटप करण्यात आले.

००००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp