मुंबई, दि. ९ : प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेबाबत केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आली होती. या योजनेचा शुभारंभ ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृह, पुसा, नवी दिल्ली येथे होणार आहे. महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्यक्रम कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृह पुणे या ठिकाणी होणार आहे. कृषी क्षेत्रात प्रयोगशील व प्रगतिशील कामगिरी करणारे ३०० हून अधिक शेतकरी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
या योजनेमध्ये कमी उत्पादकता असलेले, कमी सिंचन क्षमता असलेले, कृषी कर्जाच्या उपलब्धतेबाबत समस्या असलेल्या १०० जिल्ह्यांची निवड केंद्र शासनाने केली आहे. यात महाराष्ट्र राज्यातील पालघर, रायगड, धुळे छत्रपती संभाजी नगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या नऊ जिल्ह्यांची निवड झालेली आहे.
सद्य:स्थितीमध्ये राज्यामध्ये केंद्र व राज्य शासनाद्वारे कार्यान्वित असलेल्या ३६ हून अधिक केंद्रीय आणि राज्य योजनांच्या अभिसरणाद्वारे पिकांची उत्पादकता वाढवणे, पिक उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणे तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञान व पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशाने देशातील १०० आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री धन– धान्य कृषी योजना, नैसर्गिक शेती व कडधान्य अभियान अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत शुभारंभ कार्यक्रम होणार असून राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालय, सर्व कृषी विज्ञान केंद्र, सर्व तालुका मुख्यालय, सर्व ग्रामपंचायत, सर्व प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र, सर्व प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा पतसंस्था (PACS), सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
यामध्ये लोकप्रतिनिधी, कृषी व संलग्न विभागातील अधिकारी/कर्मचारी, कृषी विद्यापीठे /कृषी विज्ञान केद्रांचे शास्त्रज्ञ, कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, पीक स्पर्धा विजेती शेतकरी, नैसर्गिक शेती करीत असलेले शेतकरी, शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित रहावे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण https://pmindiawebcast.nic.in या लिंकद्वारे करण्यात येणार आहे.
तरी राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
– –
संध्या गरवारे/विसंअ/