Pune | Thu, 09 October 2025

Ad

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी राज्यातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन

Sunil Goyal | 6 views
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी राज्यातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन

मुंबई, दि. 7 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (दि. ८ ऑक्टोबर) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, मुंबई मेट्रो लाईन-३ च्या अंतिम टप्प्याचे राष्ट्राला समर्पण आणि ‘मुंबई वन’ या देशातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी ॲपचे लोकार्पण होणार आहे. त्याशिवाय, राज्यातील ४१९ आयटीआय आणि १४१ तांत्रिक संस्थांमध्ये २,५०६ बॅचेसच्या माध्यमातून नवीन अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम या उपक्रमाची सुरुवात प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

नवी मुंबई विमानतळाजवळील प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमास राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, लोकसभा सदस्य श्रीरंग बारणे यांच्यासह लोकप्रतिनिधी व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात नवे युग सुरू करणारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प ठरणार आहे. सिडको  प्राधिकरण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या माध्यमातून हा विमानतळ सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) अंतर्गत उभारण्यात आला आहे. या विमानतळाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रधानमंत्री मोदी हे विमानतळावरील सोयी सुविधांची पाहणी करणार आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात ₹१९,६४७ कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून, १,१६० हेक्टर क्षेत्रावर उभारलेला हा विमानतळ दरवर्षी २० दशलक्ष प्रवासी व ०.५ दशलक्ष टन मालवाहतूक हाताळू शकतो. अंतिम टप्प्यात हे विमानतळ ९० दशलक्ष प्रवासी आणि ३.२५ दशलक्ष टन मालवाहतूक क्षमतेचे जागतिक दर्जाचे केंद्र बनेल.

दोन समांतर कोड-एफ रनवे, जलद बाहेर पडण्यासाठी टॅक्सीवे, अत्याधुनिक मालवाहतूक  टर्मिनल, सौरऊर्जेवर आधारित ४७ मेगावॅटचा ऊर्जेचा पुरवठा आणि इलेक्ट्रिक बस सेवा ही या विमानतळाची वैशिष्ट्ये आहेत. तसेच, हा देशातील पहिला वॉटर टॅक्सीने जोडलेला विमानतळ असणार आहे.

या विमानतळावरुन डिसेंबर २०२५ मध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारताच्या आधुनिक, हरित आणि जागतिक दर्जाच्या विमान वाहतूक पायाभूत सुविधेचे प्रतिक ठरणार आहे.

मेट्रो लाईन-३ (अ‍ॅक्वा लाईन) च्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीत क्रांती घडवणाऱ्या ३३.५ कि.मी. लांबीच्या पूर्ण भूमिगत मेट्रो लाईन-३ च्या अंतिम टप्प्याचे आचार्य अत्रे चौक–कफ परेड मार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यावेळी लोकार्पण केले जाणार आहे.

एकूण २७ स्थानके असलेली ही लाईन दररोज १३ लाख प्रवाशांना सेवा देईल. दर पाच मिनिटांनी धावणाऱ्या आठ डब्यांच्या गाड्या प्रति तास ७२,००० प्रवासी वाहून नेतील. सायन्स सेंटर ते कफ परेड असा १०.९९ कि.मी.चा टप्पा ₹१२,१९५ कोटी खर्चून बांधण्यात आला असून, हा मार्ग मंत्रालय, उच्च न्यायालय, आरबीआय, शेअर मार्केट, मरीन ड्राइव्हसारख्या आर्थिक व सांस्कृतिक ठिकाणांना जोडला जाणार आहे.

मुंबई मेट्रो लाईन ३ हा एकूण  ₹ ३७,२७६ कोटी खर्चाचा प्रकल्प केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, जेआयसीए आणि एमएमआरसीएल यांच्या संयुक्त भागीदारीत राबविला गेला आहे. मुंबईकरांना जागतिक दर्जाची, हरित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक प्रणाली देण्याच्या दिशेने हा निर्णायक टप्पा आहे.

‘मुंबई वन’ – भारतातील पहिले एकात्मिक कॉमन मोबिलिटी अॅप

मुंबई महानगरातील प्रवाशांना अखंड आणि सुलभ प्रवास अनुभव देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मुंबई वन’ या भारतातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी अॅपचे अनावरण होणार आहे. हे अॅप उपनगरीय रेल्वे, मेट्रो लाईन्स, मोनोरेल, बेस्ट, टीएमटी, एनएमएमटी, केडीएमटी, एमबीएमटी, नवी मुंबई मेट्रो इत्यादी ११ सार्वजनिक वाहतूक ऑपरेटरशी जोडला जाणार आहे.

‘मुंबई वन’ द्वारे प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा

  • एकाच क्यूआर कोडने मेट्रो, बस, रेल्वे, मोनोरेल प्रवासाचे तिकीट मिळेल.
  • त्रिभाषिक इंटरफेस (मराठी, हिंदी, इंग्रजी) असेल.
  • रिअल-टाइम ट्रेन/बस माहिती आणि प्रवासाचे नियोजन करता येईल.
  • प्रवाशाच्या स्थान शेअर करण्याच्या सुविधेबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत संपर्काची यंत्रणा उपलब्ध
  • कॅशलेस व्यवहार व डिजिटल वॉलेट्स
  • पर्यटकांसाठी शहर मार्गदर्शक आणि आकर्षण स्थळांची माहिती
  • या अॅपमुळे प्रवाशांची अनेक अॅप्स वापरण्याची गरज संपेल, तिकीट रांगा कमी होतील आणि “डिजिटल इंडिया” उद्दिष्टांना चालना मिळेल.

कौशल्य भारतासाठी महाराष्ट्राचा पुढाकार – अल्पमुदतीचे एसटीईपी कार्यक्रम

“आत्मनिर्भर आणि विकसित भारत” या ध्येयाने प्रेरित होऊन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ‘अल्प कालावधीचे रोजगारक्षम कार्यक्रम’ (Short-Term Employability Programme -STEP) या अभिनव कौशल्य उपक्रमाचा शुभारंभ करणार आहेत.

राज्यातील 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि 141 शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये एकूण 2,506 नवीन बॅचेस सुरू होणार आहेत. या माध्यमातून 75,000 प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  त्यात महिलांसाठी ३६४ विशेष बॅचेस आणि उदयोन्मुख क्षेत्रांसाठी ४०८ नवयुगीन तंत्रज्ञान अभ्यासक्रम बॅचेस (एआय, इंटरनेट ऑफ थिंग, ईलेक्ट्रिक व्हेइकल, सौर ऊर्जा, थरस्तर उत्पादन प्रक्रिया इ. अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

दादर येथील आयटीआय मध्ये सेमीकंडक्टर टेक्निशियन कोर्स, ग्रीन हायड्रोजन उत्पादन, आयटीआय गडचिरोलीतील ट्रॅक्टर मेकॅनिक ट्रेडसाठी १०० टक्के नोकरीची हमी, तसेच नाशिक येथे होणारा कुंभमेळा लक्षात घेऊन त्या काळात रोजगार निर्माण करणारे विशेष अभ्यासक्रम हे या उपक्रमाची वैशिष्ट्ये आहेत.

सर्व अभ्यासक्रम २०० ते ४०० तासांचे, नॅशलन स्कील क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्क (NSQF)-संबंधित असून यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य मंडळाचे प्रमाणपत्र देण्यात येतील. महिला आणि ग्रामीण तरुणांसाठी रोजगारक्षमतेचे दालन खुले करणारा हा उपक्रम आहे.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे लोकार्पण व उद्घाटनानंतर ते मुख्य समारंभस्थळी मेट्रो लाईन ३, वन मोबाईल ॲपचे लोकार्पण व कौशल्य विकास कार्यक्रमांचा शुभारंभ करणार आहेत. त्यावेळी ते जाहीर सभेत नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp