रायगड – अलिबाग, जिमाका दि.४ : जितके सक्षम प्रशासन असेल तितक्या गतिमान सेवांचा लाभ जनतेला देता येईल यासाठी प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर शासनाचा भर असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे सांगितले.
रायगड जिल्हा रोजगार मेळावा, अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम नियोजन भवन, अलिबाग येथे संपन्न झाला यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी रोहयो मंत्री भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदलकर, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पठारे, राज्य उत्पादक शुल्क अधिकारी रविकिरण कोळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, महिला व बालविकास अधिकारी निर्मला कुचिक आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीडशे दिवसांच्या कार्यक्रमात ज्या बाबींचा समावेश केला होता त्यामध्ये जिल्ह्याने 100 टक्के कामकाज पूर्ण केले आहे. आज दिले जाणारे नियुक्तीपत्र हे उमेदवारांच्या जीवनातील नवीन अध्याय असून त्यांच्या भविष्याचा वेध घेणारे ठरणार आहे. मागील वर्षी सरळ सेवेने 216 उमेदवारांना ग्राम महसूल अधिकारी, 18 उमेदवारांना महसूल सहाय्यक, तर पुरवठा विभागात 41 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. तसेच 11 कर्मचाऱ्यांना शिपाई व महसूल सहाय्यक संवर्गातून ग्राम महसूल अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली. 178 अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लाभ मिळाला असून 61 अधिकाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
कोतवाल व पोलीस पाटील संवर्गातील रिक्त पदांसाठीही लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून शासनाने अनाथांसाठी 1% आरक्षण लागू केले असून याचा लाभ हजारांहून अधिक उमेदवारांना मिळाला आहे. यात चार ऑफिसर, दहा पेक्षा अधिक क्लास टू ऑफिसर आणि 400 हून अधिक क्लास थ्री ऑफिसर यांचा समावेश आहे. महायुती सरकार हे अनाथांच्या पाठीशी उभे आहे हे यावरून स्पष्ट झाले आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, १५० दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय विभागाने आस्थापना विषयक बाबींवर महत्वाचे काम पूर्ण केले आहे. तसेच सर्व बिंदू नामावलीचे काम,आय गॉट प्रणालीवरील प्रशिक्षण कोर्स पूर्ण केले आहेत.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते १२५ नवनियुक्त उमेदवारांना ( एम पी एस सी,अनुकंपा) नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.
000