पुणे, दि. ४: पुणे जिल्हा हा राज्यात नेहमीच प्रगत, सुसंस्कृत आणि कामकाजात आघाडीवर राहिलेला म्हणून ओळखला जातो. पुणे विभागाची प्रशासकीय परंपरा देखील मोठी असून या परंपरेचा अभिमान बाळगून, निष्ठा आणि सचोटीचा वारसा पुढे नेण्याचे काम करा, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या उमेदवारांना दिला. या मेळाव्यामध्ये ७७१ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अनुकंपा नियुक्तीद्वारे गट क व ड संवर्गात व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लिपिक टंकलेखक पदी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याच्या अनुषंगाने आयोजित जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यास दूरदृष्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, बापूसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील, पुणे शहर अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त सारंग आव्हाड, पुणे ग्रामीण अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,
अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सु. रा. वराडे आदी उपस्थित होते.
नियुक्ती मिळालेल्या सर्व उमेदवारांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, हा दिवस आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा, स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. अनुकंपा तत्त्वावरील आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या अशा राज्यातील एकूण १० हजार ३०९ उमेदवारांना नियुक्ती देण्यात यात आहे. याद्वारे राज्याच्या प्रशासनात नव्या दमाचे उमेदवार येत आहेत. पुणे विभागात अनुकंपा तत्त्वावर १ हजार १४ तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील ६६० उमेदवारांना आज नियुक्तीपत्रे देण्यात येत आहेत.
ते पुढे म्हणाले, अनुकंपा तत्त्वावर नियुक्त उमेदवारांसाठी आजचा क्षण हा जसा आनंदाचा आहे तसाच भावनिकही आहे. आपल्या कुटुंबातील एक जबाबदार व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यामुळे आपल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. अशा परिस्थितीत नोकरीद्वारे आपल्याला कुटुंबाला उभे करण्याची ही संधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे. आपल्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तींची स्वप्ने आपल्याला पूर्ण करायची आहेत. आपली कुटुंबासाठी आपण केवळ उमेदवार नाहीत तर कुटुंबाचा नवा आधार, आशा आणि बळ आहात, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून लिपिक टंकलेखक पदावर
स्वतःच्या कष्टाने गुणवत्तेवर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी संधी मिळवली आहे. काहींची मोठ्या पदांपर्यंत पोहोचण्याची स्वप्ने असताना खऱ्या अर्थाने हे पहिले पाऊल आहे. अभ्यास करत रहा, प्रगतीचा मार्ग खुला ठेवा. त्याच वेळी मिळालेल्या पदाची जबाबदारी निष्ठेने पार पाडा. लिपिक संवर्ग हा शासन व्यवस्थेचा कणा आहे. वरिष्ठांकडून घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी, नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि सेवा देण्याची जबाबदारी आणि काम आपले असते, असेही ते म्हणाले.
प्रामाणिकपणा, सचोटी आणि मेहनतीबाबत कधी तडजोड करू नका. या संधी आणि गुणवत्तेचा सदुपयोग समाजाच्या हितासाठी शासनाच्या प्रगतीसाठी आणि जनतेच्या सेवेसाठी काम करा. नोकरी हा केवळ अधिकार नाही तर ती एक जबाबदारी आहे. हक्कासोबत असलेले कर्तव्य लक्षात घेऊन काम करा, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, राज्य शासनाने प्रशासन गतिमान करण्याचा प्रयत्न केला. १०० दिवसांच्या कार्यक्रमातून सर्वांना समाविष्ट करून घेतले. अनुकंपा विषयक जुने शासन निर्णय आणि प्रक्रिया खूप क्लिष्ट होती. त्यामुळे राज्य शासनाने सर्व टप्पे आणि प्रक्रिया सोपी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अनुकंपा तत्त्वावर राज्यात ५ हजारावर उमेदवारांना आज नियुक्ती देण्यात येत आहे. अनुकंपावरील ‘ड’ संवर्गातील भरतीसाठीची २० टक्क्याची मर्यादा रद्द केली. या भरतीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देऊन अधिकारांचे विकेंद्रीकरण केले. तसेच लिपिक टंकलेखक भरतीसाठी वेगवेगळ्या विभागस्तरावर घेण्यात येणारी परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्य स्तरावर घेण्यात आली, असेही त्या म्हणाल्या.
विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला अनुकंपा नियुक्त्या देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. आज राज्यात साधारणता १० हजार उमेदवारांना नियुक्ती मिळत असताना अप्रत्यक्षरीत्या ५० हजार लोकांच्या जीवनात बदलाला सुरुवात झाली आहे. कुटुंबातील जबाबदार व्यक्ती आपल्यातून निघून गेल्याने आपल्यावर आलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडावी. नोकरीतील आर्थिक व्यवस्थापन नीट करावे. समाजाचे उतराई होण्याची संधी असून अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि शासनाची प्रतिमा मलिन होणार नाही अशा पद्धतीने काम करावे. शासनात येणाऱ्या उमेदवारांनी बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानानुसार आवश्यक ती प्रशिक्षणे घ्यावी, पर्यावरण रक्षणाचे काम करावे, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले, अनुकंपा भरती बाबत १९७५ पासून असलेले सर्व शासन निर्णय एकत्र करून राज्य शासनाने एकच शासन निर्णय जारी केला आणि प्रक्रिया सुलभ केली. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात नियुक्त्या देण्यात येत आहेत.
यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन लिपिक टंकलेखकपदी नियुक्त झालेल्या गणेश झाडे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात २२ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
या मेळाव्यामध्ये पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील ३७२ उमेदवारांना ४१ आस्थापनांमध्ये नियुक्ती देण्यात आली. तसेच अनुकंपा तत्त्वावर गट क मध्ये १५५ उमेदवारांना २९ आस्थापनांमध्ये आणि गट ड मधील २४४ उमेदवारांना २७ आस्थापनांमध्ये अशा एकूण ७७१ उमेदवारांना ६५ आस्थापनांमध्ये नियुक्ती देण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यातील खुल्या प्रांगणात, तसेच पाचव्या आणि चौथ्या मजल्यावरील सभागृहांमध्ये, बैठक कक्षात व्यवस्था करण्यात आली होती.
0000