Pune | Sat, 11 October 2025

Ad

राज्यात १२ ‘सिडसा’ केंद्रे स्थापन करण्यास मंजूरी – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Sunil Goyal | 3 views
राज्यात १२ ‘सिडसा’ केंद्रे स्थापन करण्यास मंजूरी – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

पुणे, दि. १० (जिमाका) : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, संशोधन प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचावे आणि तरुणांना कृषी क्षेत्रात करिअरची संधी मिळावी, या उद्देशाने राज्यातील ४ कृषी विद्यापीठांत कृषी नवोन्मेष व विकासासाठी प्रत्येकी ३ याप्रमाणे एकूण १२ ‘सेंटर फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट इन स्मार्ट ॲग्रीकल्चर’ (सिडसा) सुरु करण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात ६ आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ६ सिडसा केंद्रे सुरू करण्यात येणार असून याबाबत कृषी विभाग आणि आय व्हल्यू संस्थेमध्ये करार करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद कार्यालय येथे कृषी विद्यापीठाअंतर्गत ‘सीडसा’ स्थापन करण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार,  महासंचालक वर्षा लड्डा-उंटवाल, उपसचिव प्रतिभा पाटील, श्रीकांत आंडगे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य सदस्य  प्रवीण देशमुख, विनायक काशिद, मोरेश्वर वानखेडे, जनार्धन कातकडे प्रत्यक्ष बैठकीत तर डॉ. विवेक दामले (दूरदृश्यप्रणालीद्वारे)उपस्थित होते.

कृषिमंत्री भरणे म्हणाले, ‘सिडसा’ केंद्रामार्फत राज्यातील कृषी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान विकास अधिक परिणामकारकपणे राबविण्यात येईल. या निर्णयामुळे राज्यातील कृषी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रसार गतिमान होणार असून, महाराष्ट्र स्मार्ट शेती आणि कृषी नवकल्पनांचा राष्ट्रीय केंद्रबिंदू बनेल आणि ग्रामीण युवांसाठी ॲग्री-टेक स्टार्टअप्स आणि इनोव्हेशन इकोसिस्टम तयार होईल. हे केंद्र स्मार्ट शेतीकडे वाटचाल करणारा महाराष्ट्राचा पाया ठरणार आहे.

विद्यापीठांच्या माध्यमातून तयार होणारे नवे प्रयोग थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील आणि कृषी क्षेत्रातील उत्पादकता, कार्यक्षमता आणि नफा वाढेल. या केंद्रांच्या स्थापनेसाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही गतीने पूर्ण करावी तसेच प्रत्येक केंद्र ‘शेतकऱ्याच्या शेतात संशोधन’ या तत्वावर काम करेल याची खात्री करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

सिडसा विषयी माहिती:

‘सिडसा’ ही एक प्रगत संकल्पना असून कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान, संशोधन, डेटा विश्लेषण आणि स्मार्ट शेती उपाय विकसित करून ते थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.  कृषी शिक्षण व उद्योग यांच्यातील दरी कमी करणे, शेतीतील समस्यांवर तंत्रज्ञान आधारित उपाय शोधणे, राज्यातील कृषी डेटा बँक आणि स्मार्ट शेती मॉडेल्स विकसित करणे, ग्रामीण युवांसाठी अॅग्री-टेक स्टार्टअप्स आणि इनोव्हेशन परिसंस्था तयार करणे आणि जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राची प्रतिस्पर्धात्मकता वाढवण्यासाठी ही केंद्रे महत्त्वाची ठरणार आहेत.

या केंद्रात कृषी ऑटोमेशन लॅब-एए, स्मार्ट प्रिसिजन ॲग्रीकल्चर लॅब, एआर, व्हीआर सर्व्हिसेस लॅबसह कृषी तंत्रज्ञान सोल्यूशन्स, कृषी उपकरणे इनोव्हेशन लॅब, शेतीसाठी प्रगत ड्रोन तंत्रज्ञान आणि जिओस्पेशिअल फार्मिंग सोल्युशन्स लॅब अशा विविध लॅब्स तयार होणार आहे. आयओटी, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, रिमोट सेंसिंग, डेटा ॲनालिटिक्स अशा तंत्रांचा उपयोग करून स्मार्ट शेती विकसित करण्यावर भर देण्यात येणार आह. कृषी विद्यापीठे, उद्योग, स्टार्टअप्स आणि शेतकरी यांच्यात समन्वयाचे व्यासपीठ निर्माण होईल.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp