नागपूर, दि. ०६ : आजचा दिवस सर्व अनाथ, दिव्यांग व्यक्तीचा मनात आत्मविश्वास निर्माण करणारा असून आमची माला नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होतांना पाहून मन भरुन आल्याचा भावना पद्मश्री सन्मानित शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अनुकंपा व सरळसेवा भरती प्रक्रियेला गती देऊन अत्यंत पारदर्शीपणे संपूर्ण राज्यात ही मोहीम यशस्वी राबविल्याबद्दल त्यांनी शासन व जिल्हा प्रशासनाप्रती गौरोद्गार काढले.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या प्रेरणेचे स्त्रोत ठरणाऱ्या घटनेला स्वत: तिला सोबत घेऊन नियुक्ती देण्यात आलेल्या गृह शाखेत जाऊन तिच्या खुर्चीवर बसविले. अनेक आव्हानांवर मात करुन परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्तेवर उभी राहिलेली माला ही खऱ्या अर्थाने युवकांची प्रेरणा व्हावी, अशा भावना व्यक्त करुन त्यांनी मालाला शुभेच्छा दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, पापळकर यांच्या संस्थेला वेळोवेळी सहकार्य करणारे ज्येष्ठ संपादक श्रीमंत माने, प्राप्ती माने, रोटरी क्लबचे पदाधिकारी व विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. विशेष म्हणजे तिचे पालकत्व स्विकारलेले शंकरबाबा पापळकर हे स्वत: तिला शासकीय सेवेत रुजू होताना साक्षीदार होण्यासाठी आले होते.
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यभर ही मोहीम अत्यंत कमी कालावधीत यशस्वीपणे राबविली. दिनांक 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या राज्यव्यापी सोहळ्यात संपूर्ण राज्यातून 10 हजार 309 उमेदवारांना शासन सेवेतील नियुक्तीचे आदेश देण्यात आले. यात नागपूर जिल्ह्यातील एकूण 941 युवा-युवतींना अनुकंपा व सरळसेवा भरतीद्वारे नियुक्ती देण्यात आली. यातील अनाथ असलेल्या माला पापळकर हिने आपल्या अंधत्वावर मात करुन जिद्दीने निवड परीक्षेत यश साध्य केले. महसूल सहायक पदावर तिची निवड झाली.
जी जबाबदारी दिली जाईल ती यशस्वीपणे पूर्ण करेन – माला पापळकर
शासकीय सेवेतील कर्तव्यनिष्ठेची जबाबदारी मी समजून घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत मी प्रामाणिक प्रयत्न करेल, अशी भावना माला पापळकर हिने व्यक्त केली. पहिली ते सातवी पर्यंतचे माझे प्राथमिक शिक्षण व नंतर परतवाडा येथील पदवीपर्यंतचे शिक्षण मला शासकीय संस्थेसह बाबांच्या मदतीने घेता आले. ब्रेल लिपीतून उच्च तंत्रज्ञानाचा अविष्कार ठरलेल्या ऑनलाईन क्लासेसला मला मोबाईलच्या माध्यमातून जुळता आले. यातूनच मी स्पर्धा परीक्षेचा सराव करायला शिकले. ब्रेल लिपीतून व्हाईस सर्च पर्यंतचा हा प्रवास माझ्या आत्मविश्वासाला बळ देणारा ठरल्याचे तिने सांगितले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनाथ मालाला दिल्या अनोख्या शुभेच्छा
दिवसभराची कार्यव्यस्तता सांभाळत राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आजची जिल्हाधिकारी कार्यालयातील भेट सर्व कर्मचाऱ्यांच्या उत्साहाला बळ देणारी ठरली. निमित्त होते अनाथ असलेल्या मालाने आपल्या अंधत्वावरही यशस्वी मात करुन निवड परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेला घातलेली गवसणी! तिचे हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरावे अशा शब्दांत मंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील गोपनीय शाखेत माला पापळकरच्या जागेवर जाऊन तिला शुभेच्छा दिल्या. ‘तुझ्यामधे असलेल्या सुप्त गुणांना ओळखून कामाची जबाबदारी देऊ’असे त्यांनी सांगून तीचे मनोबल उंचावले…
०००