मुंबई दि. ७ :- साताऱ्यातील संगम माहुलीच्या शिवकालीन राजघाट परिसरातील महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई, पहिले शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचे जतन आणि संवर्धन, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण, संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक या स्थळांच्या परिसराचा पुनर्विकास करताना तेथील परिसर, समाधी स्थळ, प्राचीन वास्तूंचं मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीत संगम माहुली, सातारा येथे महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई आणि पहिले शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे संवर्धन, जीर्णोद्धार आणि जमीन विकसित करणे, साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला सुशोभीकरण, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक या स्थळांच्या परिसर विकासाबाबत आढावा घेण्यात आला.
या सर्व ऐतिहासिक स्थळांचा पुनर्विकास करताना पुढील शंभर वर्षे टिकेल अशी वास्तू उभारावी. त्या ठिकाणी पुरेसे वृक्षारोपण करावे, स्वच्छता राखावी, पर्यटन आणि व्यावसायिक दृष्टिकोनही ठेवावा, भविष्यातील देखभाल – दुरुस्ती बाबतही आतापासूनच उपाययोजना करावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
संगमेश्वर येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भातही या बैठकीत आढावा घेण्यात आला आणि आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसचिव नंदा राऊत, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे उपस्थित होते. तर पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोकणचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे सहभागी झाले होते.
0000
देवेंद्र पाटील/जसंअ/