Pune | Fri, 10 October 2025

Ad

सेवा भावनेतून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

Sunil Goyal | 6 views
सेवा भावनेतून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

गडचिरोली, दि. ४ (जि.मा.का.): शासकीय सेवक म्हणून काम करताना प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या कार्यातून सामान्य नागरिकांच्या मनात शासनाविषयी सकारात्मक भावना, विश्वास आणि आनंद निर्माण व्हावा, अशा सेवा भावनेतून काम करण्याचे आवाहन राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमात आज सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांच्या हस्ते अनुकंपा व सरळ सेवेच्या प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. राज्यात आज एकाच वेळी सर्व जिल्ह्यांतील उमेदवारांना नियुक्ती देण्याचा मुख्य कार्यक्रम मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे पार पडला.
गडचिरोलीतील नियोजन भवन येथे झालेल्या या सोहळ्याला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, उपवनसंरक्षक श्रीमती आर्या, अपर पोलीस अधीक्षक गोकुळ राज, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, माजी आमदार डॉ. देवराव होळी आदी मान्यवर उपस्थित होते.
सहपालकमंत्री जयस्वाल यांनी नव्याने नियुक्त उमेदवारांना उद्देशून सांगितले की, “शासनाने दिलेल्या या संधीचा उपयोग जनतेला सुलभ व जलद सेवा देण्यासाठी करा. नागरिकांना समाधान आणि शासनाविषयीचा विश्वास देणारी सेवा हीच खरी शासकीय सेवा आहे. आपल्या भाऊ-बहिणींच्या संमतीने आपली नियुक्ती झाली आहे त्यामुळे नोकरी करतांना त्यांचीही काळजी काळजी घ्या” असे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रास्ताविकातून सांगितले की, एकूण २१० उमेदवारांना समुपदेशन व पारदर्शक प्रक्रियेद्वारे नियुक्ती देण्यात येत आहे. यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेले ८० तर अनुकंपा तत्त्वावर १३० उमेदवारांचा समावेश आहे. यापैकी ५९ महिला आहेत. विशेष म्हणजे, अनुकंपा यादीतील ११ उमेदवार १० वर्षांपासून आणि त्यापैकी दोन उमेदवार तब्बल १५ वर्षांपासून प्रतिक्षा यादीत होते. अखेर त्यांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला आहे. सर्व उमेदवारांनी प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठेने काम करून जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
या कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, नव्याने नियुक्त कर्मचारी आणि त्यांच्या पालकांची उपस्थिती होती. नियुक्तीपत्र स्वीकारताना अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि आनंदाश्रूंचे भाव उमटले, तर सभागृहात टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.
आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp