Pune | Fri, 10 October 2025

Ad

शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Sunil Goyal | 5 views
शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दिनांक ४ ऑक्टोंबर (जिमाका वृत्तसेवा):  शासकीय नोकरीत रुजू होताना आपल्या मनात केवळ ‘नोकरी’ ही भावना न ठेवता ‘जनतेची सेवा’ हीच भावना ठेवा. शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा,” असे भावनिक प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित अनुकंपा भरती 2025 अंतर्गत गट क व गट ड संवर्गातील उमेदवार, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत लिपिक टंकलेखक भरती 2023 गट क या संवर्गातील उमेदवारांच्या नियुक्ती आदेशांचे वाटप कार्यक्रमात, उमेदवारांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
यावेळी, खासदार स्मिता वाघ,आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, तुमच्याकडे कामानिमित्त आलेल्या प्रत्येक नागरिकांशी चांगले वागा, तुम्ही जनतेचे सेवक आहात, जनतेची सेवा करा, तनावमुक्त वातावरणात उत्साहात आपली कर्तव्य पार पाडा, आपल्या कामासोबत आपल्या शरीराकडेही लक्ष द्या, तुमचा फिटनेस सांभाळा, आपलं काम प्रामाणिकपणे करा, नोकरीमुळे आता तुमची जबाबदारी वाढली आहे, तुमच्या कुटूंबाने संकटात, दुखात तुम्हाला घडविले, वाढविले, शिक्षण दिले, त्या कुटुबांचा सांभाळ करा, जनतेच्या सेवेतच देव आहे, असे माणून काम करत राहा.असे सांगत त्यांनी सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात.
खासदार स्मिता वाघ, आपल्या मनोगतात म्हणाल्या, नोकरी करतांना प्राणिकपणे काम करुन समाजाची सेवा करा, येणारी पिढी तुमचे कौतुक करेल असे काम करुन दाखवा, नोकरीच्या निमित्ताने जनतेची सेवा करतांना त्यांनी तुम्हाला स्मरणात ठेवले पाहिजे, या उद्देशाने काम करत रहा, असे त्यांनी सांगितले.
आमदार श्री.भोळे यांनी राज्य शासनाने एकाच वेळी 10 हजार उमेदवारांना नियुक्त्या दिल्याबद्दल सर्व मंत्रीमंडळाचे आभार व्यक्त करुन ते म्हणाले, सामजातील गरजू नागरिकांना नेहमीच सहकार्य करा, नोकरी करतांना जनतेचे आर्शिवाद मिळाले पाहिजे, या पध्दतीने काम करा.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, “सेवेत असताना समाजासाठी निस्वार्थपणे काम करा, समस्यांचे समाधान शोधण्याची क्षमता विकसित करा आणि कार्यक्षमतेत इतकी वाढ करा की अधिकारी स्वतः तुम्हाला शोधतील,” असे आवाहन, यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना केले, सर्वांनी आपले आरोग्य सांभाळत, संयमाने आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी, आपल्या मनोगतात नवनियुक्त उमेदवारांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
३१३ उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे  वितरण
       शासनाच्या “१५० दिवसांच्या उपक्रमांतर्गत” अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेत गट ‘क’ संवर्गातील ४१, गट ‘ड’ संवर्गातील १४७ आणि एमपीएससी द्वारे शिफारस केलेले १२५ उमेदवार अशा एकूण ३१३ उमेदवारांना,शासकीय नोकरीचे नियुक्ती आदेशांचे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
   यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, आस्थापना विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक,निवासी उपजिल्हाधिकारी  वैशाली चव्हाण यांनी केले.
  कार्यक्रमात यावेळी  नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि समाधानाचे भाव झळकत होते, याप्रसंगी नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांनी शासनाचे आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.
आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp