Pune | Fri, 10 October 2025

Ad

शासकीय नोकरी ही समाजसेवेची संधी समजून काम करा- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Sunil Goyal | 4 views
शासकीय नोकरी ही समाजसेवेची संधी समजून काम करा- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

अनुकंपा धोरणातील बदलामुळे नियुक्ती प्रक्रिया गतिमान

लातूर, दि. ०४ : जिल्ह्यात १०३ अनुकंपाधारक उमेदवारांना गट-क आणि गट-ड संवर्गात, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) सरळसेवा परीक्षेतून निवड झालेल्या ७१ उमेदवारांना लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. शासकीय सेवेत दाखल झालेल्या या सर्व नवनियुक्त उमेदवारांनी शासकीय नोकरी ही समाजसेवेची संधी समजून काम करावे आणि आपल्या सेवेतून समाज व जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते अनुकंपा तत्त्वावर गट-क, गट-ड संवर्गातील आणि एमपीएससीद्वारे लिपिक-टंकलेखक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर महानगरपालिका आयुक्त मानसी आणि अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांची प्रमुख उपस्थिती होते.

मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या नियुक्ती आदेश प्रदान कार्यक्रमाचे थेट प्रसारण या जिल्हास्तरीय कार्यक्रमात दाखवण्यात आले. लातूर जिल्ह्यात गट-क संवर्गातील ३७ आणि गट-ड संवर्गातील ६६ अशा एकूण १०३ अनुकंपाधारक उमेदवारांना, तसेच एमपीएससीद्वारे लिपिक-टंकलेखक पदावर निवड झालेल्या ७१ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले. यावेळी पालकमंत्री श्री. भोसले, सहकार मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात आदेशांचे वितरण करण्यात आले.

राज्य शासनाने अनुकंपा धोरणात केलेल्या बदलांमुळे नियुक्ती प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान झाली आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांत प्रशासकीय स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे १०३ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळाली. तसेच, एमपीएससीद्वारे निवड झालेल्या ७१ उमेदवारांना लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्ती देण्यात आली. यामुळे शेतकरी कुटुंबातील युवक-युवतींना शासकीय सेवेची संधी मिळाली आहे. या सर्व उमेदवारांनी शेतकरी आणि समाजातील गरीब घटकांच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे काम करावे आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पालकमंत्री भोसले यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने मार्गी लागली आहे, याबद्दल सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांचे आभार मानले. आज एकाच दिवशी जिल्ह्यातील १०३ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळाली आहे. यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्य गमावलेल्या कुटुंबांना आधार मिळणार आहे. तसेच, सरळसेवा भरतीद्वारे नियुक्ती मिळालेल्या ७१ उमेदवारांचे शासकीय नोकरीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या सर्व नवनियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे सहकार मंत्री यावेळी म्हणाले.

शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि सचोटीने पार पाडून समाजाची सेवा करावी, असे आमदार विक्रम काळे यांनी सांगितले.

राज्यात प्रथमच एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने नियुक्त्या देण्यात येत असल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी १७४ उमेदवारांचे अभिनंदन केले.

नवीन अनुकंपा धोरणामुळे नियुक्ती प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान झाली आहे. अनुकंपाधारक आणि एमपीएससीद्वारे निवड झालेल्या सर्व उमेदवारांनी शासकीय योजनांचा आणि सेवांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यावेळी म्हणाल्या.

प्रारंभी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी प्रास्ताविकात अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेची माहिती दिली. नवीन अनुकंपा धोरणामुळे ही प्रक्रिया गतिमान झाल्याचे त्यांनी नमूद केले.

 

गेल्या काही वर्षांपासून विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अनुकंपाधरकांची नियुक्तीची कार्यवाही रखडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकंपा नियुक्तीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले. त्यामुळे अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया गतिमान आणि सुलभ झाली. या अंतर्गत जिल्ह्यातील १०३ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात मिळाली आहे. नियुक्ती आदेश स्वीकारल्यानंतर या उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य शासनाचे आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. यासोबतच एमपीएससीद्वारे घेण्यात आलेल्या पारदर्शक परीक्षेमुळे लिपिक-टंकलेखक पदावर निवड झालेल्या उमेदवारांनीही शासनाचे आभार मानले.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp