परभणी जिल्ह्यात १३७ उमेदवारांना मिळाली शासकीय नोकरीची संधी
परभणी, दि. ४ (जिमाका) : अुनकंपा तत्वावर आणि एमपीएससी मार्फत शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या उमेदवारांनी नोकरीच्या माध्यमातून कर्तव्यनिष्ठा व प्रामाणिकपणे जनतेची सेवा करुन आपले राज्य व देशाचे भविष्य उज्वल करावे, असे आवाहन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.
मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी दूरदृष्य प्रणालीव्दारे पालकमंत्री बोलत होत्या.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, संगीता चव्हाण, शैलेश लाहोटी, उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे आदींसह नोकरीसाठी निवड झालेले उमेदवार व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
प्रारंभी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्याच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे दूरदृ्ष्य प्रणालीव्दारे थेट प्रसारण करण्यात आले होते. यानंतर परभणी जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर गट क व गट ड तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळसेवा भरतीव्दारे निवड झालेल्या 137 उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. यामध्ये अनुकंपाचे 97 आणि एमपीएससी मार्फत नियुक्त 40 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
शासकीय सेवेत निवड झालेल्या सर्व उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन पालकमंत्री म्हणाल्या की, आजचा दिवस आनंदाचा आहे. राज्यात इतक्या मोठ्या संख्येने शासकीय सेवेत भरती झाली आहे. अतिशय पारदर्शक पध्दतीने करण्यात आलेल्या या भरतीमुळे राज्यशासन अधिक गतीमान होण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात विकसित भारत-2047 ही देशाची नवीन ओळख निर्माण होणार आहे, त्याचाच एक भाग म्हणून आपले राज्य विकासाच्या दिशेने गतीने वाटचाल करीत आहे. या वाटचालीत आज नियुक्त झालेल्या उमेदवारांचे योगदानही अत्यंत मोलाचे ठरणार आहे, त्यामुळे नियुक्त उमेदवारांनी मिळालेल्या संधीचे सोने करुन जनतेची सेवा प्रामाणिकपणे करावी.
जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, नोकरीवर असताना घरातील कर्त्या व्यक्तीचे अचानक निधन झाल्यामुळे अनुकंपा तत्वावर मिळालेल्या नोकरीचे महत्व जाणून घेत उमेदवाराने नियुक्तीच्या ठिकाणी मन लावून सकारात्मक पध्दतीने काम करावे. आपल्या कुटुंबाची व्यवस्थित काळजी घ्यावी. काम करीत असताना नवनवीन कौशल्य आत्मसात करुन जनतेची सेवा करावी.
पोलीस अधीक्षक श्री. परदेशी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती माथुर यांनी आपल्या मनोगतात नवनियुक्त उमेदवारांना शुभेच्छा देऊन नियमानुसार आणि प्रामाणिकपणे काम करण्याची सूचना केली.
भरती प्रक्रियेचे कामकाज उत्कृष्ट पध्दतीने केल्याबद्दल यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी व नायब तहसिलदार प्रशांत वाकोडकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. घोन्सीकर, मनपाचे उपायुक्त श्री. कांबळे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आस्थापन शाखेचे अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांचा जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक श्रीमती ढालकरी यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक प्रवीण वायकोस यांनी केले.