सातारा दि. ४ : शासन गतिमान आहे. प्रशासकीय कामकाज गतिमान करणे हे आपल्या सर्वांचे ध्येय आहे. शासनाच्या धोरणाने अंत्यंत सुलभपणे आपल्याला शासकीय सेवेमध्ये नियुक्ती मिळाली आहे याची जाणीव ठेवून चांगले काम करा, शासनाच्या कल्याणकारी ध्येय धोरणांचा सर्वसामान्य घटकांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लाभ मिळवून द्या. शासन आणि जनता यामधला दुवा म्हणून काम करा. पालकमंत्री म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी राहिन, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा व जिल्हा प्रशासन यांच्यावतीने अनुकंपा उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे लिपिक टंकलेखक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण कार्यक्रम पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षेतेखाली स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह सातारा येथे झाला.यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराज, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, तहसीलदार शशिकांत जाधव आदी उपस्थित होते.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, गतिमान प्रशासनाला आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले पाहिजे हे लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनातील रिक्त असणारी पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानूसार 17 जुलै 2024 रोजी अनुकंपा भरतीचा अत्यंत सुटसुटीत असा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती राधा यांनी तयार केला. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया राबविण्यात आली. सातारा जिल्ह्यातही आपण ही सर्व प्रक्रिया पूर्ण करुन अनुकंपा धोरणानुसार 172 आणि उर्वरित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील अशा जवळपास 248 नियुक्त्या दिल्या आहेत.

नियुक्त झालेल्या उमेदवारांना उद्देशून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ज्याप्रमाणे तुम्हाला अत्यंत सुलभ् व सुटसुटीत पध्दतीने शासकीय नोकरी मिळाली आहे. याची जाणीव ठेवून लोकांसाठी, समाजातील सर्व घटकांसाठी तत्परतेने काम करा. आपण शासकीय नोकरीत कसे आलो आहे याची जाणीव ठेवून संपूर्ण सेवा काळात लोकांनाही अशाच सुलभ व जलदगतीने सेवा द्या. आपण जनतेचे सेवक आहोत याची जाणीव ठेवा. माझी शाळा आर्दश शाळा, गतिमान प्रशासन स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अशा अनेक उपक्रमांमध्ये सातारा जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. यापुढेही जिल्ह्याचा नाव लौकीक वाढविण्यासाठी सकारात्मक पध्दतीने तुमची उर्जा शासकीय सेवेमध्ये पणाला लावा आणि काम करा. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुमच्या अडीअडचणींमध्ये तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन, अशी ग्वाहीही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिली.
जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अनुकंपातत्वावरील आणि एमपीएससीच्या मार्फत लिपीक वर्गीय परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले सर्व यशस्वी विद्यार्थी यांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी देण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाच्या मानवी चेहऱ्याचे प्रतिक आहे. नवनियुक्त उमेदवारांच्या आयुष्यामध्ये हा क्षण अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात होणार आहे. खरंतर कोणाच्याही आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या घरातील कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेमध्ये प्रविष्ट होणे हा सर्वाधिक आनंदाचा क्षण असतो. सर्वात आश्वासक सेवा जर कुठली असेल तर ती आजही शासकीय सेवा समजली जाते . महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत अनेक शासन निर्णय अनुकंपा नियुक्तीच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेले होते. त्याची अंमलबजावणी करण्यात आली. परंतु या धोरणामध्ये अनेक वेळेस सुधारणा झाल्या. बदल झाले आणि एकूण शासन निर्णयाची संख्या जवळपास 45 च्या आसपास गेलेली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करून सर्व समावेशक एकच एक शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा अशा सूचना दिल्या . यानंतर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग श्रीमती राधा यांनी 17 जुलै 202४ ला या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला. यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने उमेदवारांचे मेळावा घेऊन त्याचे पसंतीक्रम घेतले. सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडली. आज १७२ अनुकंपा धारकांना नियुक्तीपत्र देण्यात येत आहे.
ज्यांच्या कुटुंबातील शासकीय सेवेतील व्यक्ती दुर्दैवाने मृत झाल्यास त्यांच्या सेवेचा आदर ठेवून त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी अनुकंपा नियुक्ती देण्यात येते, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, शासकीय नोकरी मिळाली की आपण निर्धास्त होतो. एकदा नोकरी मिळाल्यानंतर आपल्याला कोणी काढणार नाही अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. पण या नियुक्तीमुळे आपल्यावरची जबाबदारी जास्त आहे. सर्वसामान्य जनते प्रती आपल्याला उत्तरदायी राहिले पाहिजे. आणि सेवा या शब्दाचा अर्थ आपल्या कामामधून आपण व्यक्त केला पाहिजे. तो खरा ठरवला पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, अनुकंपा उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे लिपिक टंकलेखक पदावर निवड झालेल्या उमेदवार यांच्यासह त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000