मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनुकंपा तत्वावरील व सरळ सेवेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान
नागपूर,दि.४: शासकीय सेवेत आज रुजू झालेल्या उमेदवारांनी प्रामाणिक व पारदर्शीपणे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना शासनाच्या लोककल्याणकारी सेवा जनतेपर्यंत आत्मियतेने पोहोचवाव्यात असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.
येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री बावनकुळे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार आशिष देशमुख, आमदार प्रवीण दटके, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त श्रीमती आयुषी सिंह, माजी आमदार सुधाकर कोहळे, मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी व विभाग प्रमुख या कार्यक्रमास उपस्थित होते.
श्री. बावनकुळे म्हणाले, राज्यातील प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासनाद्वारे विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी शासकीय विभागांसाठी १०० दिवस आणि त्यानंतर १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांचा हाती घेतलेल्या कार्यक्रमात राज्यातील भरती प्रक्रिया हा महत्त्वाचा टप्पा होता. त्यानुसार विविध शासकीय विभागांमध्ये भरती प्रक्रियेचा विषय प्राथम्याने हाती घेण्यात आला. आज राज्यभरात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने भरती करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात अनुकंपा तत्वावर गट-क च्या १२७ उमेदवारांना, गट-ड १५६, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेले ३०३, महापालिकेत सरळ सेवेतून १५६ व लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार महापालिकेतील १९९ अशा एकूण ९४१ उमेदवारांना पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते आज शासकीय नोकरीची नियुक्ती पत्रे ऑनलाइन पद्धतीने प्रदान करण्यात आली. उपस्थितांच्या हस्ते २१ उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात पत्रे प्रदान करण्यात आली.
जिल्हाधिकारी इटनकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राज्य शासनाने प्रथम अनुकंपा धोरणाचा अभ्यास केला. त्यात आवश्यक ते बदल करून सामान्य प्रशासन विभागाशी समन्वय साधत हा व्यापक निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व इतर विभागांनी केलेल्या कार्यवाहीबद्दल त्यांनी विस्ताराने माहिती दिली.
या मेळाव्यात विविध शासकीय विभागांकडून लावण्यात आलेल्या स्टॉल्सवरून संबंधित उमेदवारांनी आपली नियुक्तीपत्रे प्राप्त केली. उमेदवारांचे पालक व कुटुंबीय यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय सेवेची नियुक्तीपत्रे प्राप्त केलेल्या उमेदवारांनी आनंद व समाधानाची भावना यावेळी व्यक्त केली. उमेदवारांचे मनोगत व्यक्त करणारी चित्रफित यावेळी सादर करण्यात आली. अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान
राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मंत्री महोदयांच्या उपस्थितीत आज अनुकंपा तत्त्वावरील व सरळ सेवेद्वारे नियुक्त लिपिक-टंकलेखक अशा १० हजार ३०९ उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. नवीन भरती झालेल्या उमेदवारांना यावेळी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे ह्या कार्यक्रमाचे प्रसारण नागपूर येथे आयोजित या कार्यक्रमात करण्यात आले.
प्रतिनिधिक स्वरूपात नियुक्ती आदेश वितरित करण्यात आलेले उमेदवार
महसूल विभागात महसूल सहायक या पदावर माला शंकरराव पापळकर, अस्मिता रमेश गिरी, पवन रुपराव तागडे, सचिन प्रकाशराव खेडकर, ग्राम महसूल अधिकारी मधुकर देवराव गायकवाड, शिपाई पदावर यश दत्तकुमार कामडे, प्राची प्रभाकर लाखे, अयुब सुजेन पठाण यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
नागपूर महापालिकेत कनिष्ठ अभियंता या पदावर पार्थ अनिल दुपल्लीवार, प्रज्वल अनंत वैद्य, स्थापत्य अभियंत्रिकी सहायक म्हणून सुरभी शंकरराव रोडगे, परिचारीका पदावर सिमा निवृत्ती बडे, कनिष्ठ लिपीक या पदावर शुहेला कौसर जौ. सैयद आदिल तर सफाई कर्मचारी अविनाश अजय हारकर यांना नियुक्ती देण्यात आली.
जिल्हा परिषदेअंतर्गत अंगणवाडी परिवेक्षिका शुभांगी हरिहर समरीत, व विस्तार अधिकारी अक्षय किशोर वानखडे, नगरपालिका प्रशासन येथे फायरमॅन पदावर मोहम्मद अनस वल्द अल्ताफ हुसैन, सार्वजनिक बांधकाम विभागात लिपीक या पदावर रविंद्र गजानन ठाकरे, कविता रेशवंत हजारे यांना शिपाई, पोलिस विभागात लिपीक पदावर स्वाती रमेश गवळी व शिपाई या पदावर सुप्रिया शांतराम लोहे यांना उपस्थितांच्या हस्ते नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.
0000