यवतमाळ, दि. २ (जिमाका) : धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान जिल्ह्यातील 366 गावे व पारधी बेड्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या मास्टर ट्रेनरची कार्यशाळा दिनदयाल प्रबोधिनी निळोणा येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेवटच्या आदिवासी व्यक्तीपर्यंत विभागाच्या योजना पोहचावा, असे कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आदिवासी विकास मंत्री प्रा.डॅा.अशोक वुईके यांनी सांगितले.
कार्यशाळेचे उद्घाटन प्रा.डॅा.वुईके यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विकास मिना, सहायक जिल्हाधिकारी तथा पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमित रंजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, पुसद आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
अभियानात सहभागी विभागांनी शेवटच्या आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवावा. गावपातळीवरील आवश्यक विकासात्मक आराखडा तयार करुन दिनांक 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत आराखड्यास मंजुरी घेण्यात यावी. सदर आराखडा प्रथम प्राधान्याने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास सादर करावा, असे निर्देश प्रा.डॅा.वुईके यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अभियानात जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी उत्कृष्ट काम करावे, अशा सूचना केल्या. पांढरकवडा प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांनी योजनेच्या अंमलबजावणीकरीता मार्गदर्शन केले.
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत जिल्ह्यातील 366 गावे व पारधी बेड्यांवर जनजागृती कॅम्प, शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले असून या कॅम्पमध्ये अनुसूचित जमातीच्या नागरीकांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणी करिता आदि कर्मयोगी अभियान राबविण्यात येत असून जिल्हास्तरावरील डिस्ट्रीक मास्टर ट्रेनर नेमलेले आहे. शासनस्तरावरुन आवश्यक प्रशिक्षण दिनांक 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान नागपूर येथे देण्यात आले आहे.
त्यानंतर जिल्हाधिकारी विकास मिना यांच्या अध्यक्षतेखाली समाविष्ठ यंत्रणाच्या जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुकास्तरावरील ब्लॉक मास्टर ट्रेनरची कार्यशाळा आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. त्यानुसार दिनांक 2 ते 4 सप्टेबरपर्यंत पंडित दिनदयाल प्रबोधिनी, निळोणा येथे जिल्ह्यातील 16 तालुकास्तरावरील एकुण 93 ब्लॉक मास्टर ट्रेनरची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन आज झाले. कार्यक्रमाचे आभार पुसद प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांनी केले. कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी तसेच तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर उपस्थित होते.
०००