
शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
पुणे, दि. ३१ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून प्रत्येक पात्र नागरिकाला त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा. समाजसुधारकांच्या विचारांना अनुसरून स्वच्छ, समृद्ध, आधुनिक आणि कृषीकेंद्रित महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
सकाळ माध्यम समूहातर्फे डेक्कन महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित पुणे विभागीय ॲग्रोवन सरपंच महापरिषदेत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, ॲग्रोवनचे कार्यकारी संपादक रमेश जाधव, ॲड्रियास स्टील प्रा. लि.चे सहयोगी संचालक अनिल पाटील, कपुर ट्रॅक्टरचे व्यवस्थापक शालन श्रीवास्तव तसेच पुणे विभागातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी मंत्री श्री. भरणे म्हणाले, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी राज्य शासन सातत्याने कार्यरत आहे. स्वच्छ पाणी, निवारा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि जलसंधारण यांसारख्या मूलभूत सुविधांना केंद्रस्थानी ठेवून ग्रामपंचायतींनी विकासाची दिशा निश्चित करावी. गावातील समस्या सोडविण्यासाठी लोकसहभागातून विकास आराखडा तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासोबतच उपलब्ध निधीचा पारदर्शकपणे व परिणामकारक वापर करावा. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून आदर्श ग्रामपंचायती उभारण्याचे प्रयत्न व्हावेत. दिशादर्शक कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, कृषी क्षेत्राबरोबरच ग्रामीण विकासातही ॲग्रोवन वृत्तपत्राने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विविध लोककल्याणकारी योजना आणि आधुनिक कृषीविषयक माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य या माध्यमातून सातत्याने होत आहे.
पायाभूत सुविधा समृद्ध करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध- ग्रामविकास जयकुमार गोरे

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, राज्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी गावपातळीवर होत असून शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी, जलसंधारण व्यवस्था आदी पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन व्यापक स्वरूपात विकासकामे हाती घ्यावीत.
बदलते हवामान, आधुनिक तंत्रज्ञान, मृदा परीक्षण, कार्यक्षम सिंचन व्यवस्था, जलसंधारण तसेच यशस्वी शेतकरी व आदर्श ग्रामपंचायतींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शेती आणि ग्रामीण विकासाचा नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले. जलयुक्त शिवार योजना, पाणी कप स्पर्धा आणि बंधारे उभारणीच्या माध्यमातून राज्यात जलसाठवणुकीची व्यापक चळवळ उभी करण्यात आली असून शेतकऱ्यांनीही पाणी बचतीला प्राधान्य देत नियोजनबद्ध शेती करावी, असे ते म्हणाले. सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेली ही विकासाभिमुख परिषद गावांच्या विकासाला नवी दिशा देणारी असून, येथे मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग ग्रामविकासासाठी करावा, असे आवाहन श्री. गोरे यांनी केले.
सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्तेसह आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत अधिकाधिक वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ॲग्रोवनचे कार्यकारी संपादक रमेश जाधव यांनी प्रास्ताविक केले.
00000