मुंबई, दि. ९ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे सुरू करण्याच्या कार्यवाहीसाठी तीन सदस्यीय समिती नेमावी. या समितीने उपकेंद्रासाठी योग्य जागेची पाहणी करून सविस्तर आराखडा सादर करावा, असे निर्देश सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण विभागाची बैठक झाली. राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार रणधीर सावरकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, सहसचिव संतोष खोरगडे, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, विद्यापीठाचे रजिस्ट्रार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जे.जे.कला महाविद्यालयात आर्ट म्युझियम उभारावे
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. येथील कलाकृती पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित राहाव्यात, याकरिता आधुनिक सुविधांसह आर्ट म्युझियम उभारावे.
यावेळी सर जे. जे. कला महाविद्यालयाच्या समृद्ध कलावैभवाचे जतन, संवर्धन आणि प्रदर्शनासाठी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त आर्ट गॅलरी उभारण्याच्या आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या गॅलरीत संस्थेतील ऐतिहासिक व दुर्मिळ कलाकृतींचे डिजिटल दस्तऐवजीकरण, विद्यार्थ्यांसाठी संशोधन व अभ्यासासाठी खुले प्रदर्शन विभाग, तसेच आधुनिक कलाप्रदर्शनासाठी स्वतंत्र दालन उभारण्याबाबतही चर्चा झाली.
बैठकीस तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्राचार्य राजीव मिश्रा, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, सहसचिव संतोष खोरगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई नियामक परिषदेचे पाचवी बैठक झाली. या बैठकीत अकोला जिल्ह्यातील पातूर येथील महात्मा फुले कला विज्ञान महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा घेण्यात आला.
0000
मोहिनी राणे/ससं/