मुंबई, दि. ७ : राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण सुनिश्चित करण्यासंदर्भात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आलेली आहे. या समितीचा छत्रपती संभाजीनगर येथील दि. ८ ऑक्टोबर रोजीचा समितीचा दौरा पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे उपसंचालक (प्रकल्प/प्रशा) संजय डोर्लीकर यांनी दिली आहे.
त्रिभाषा धोरण समितीच्या दि. १७ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या बैठकीमध्ये समिती सदस्यांद्वारे राज्यातील आठ ठिकाणी प्रत्यक्ष दौरे करून राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, शिक्षणतज्ज्ञ, संस्थांचे प्रतिनिधी, पालक-शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, विचारवंत, आंदोलक यांची मते जाणून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. यानुसार दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे दौरा करण्याचे बैठकीमध्ये निश्चित करण्यात आलेले होते.
मागील काही दिवसांपासून मराठवाडा भागात मुसळधार पाऊस झाल्याने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणा नागरिकांना मदतकार्य पोहोचविण्यामध्ये व्यस्त आहेत. अद्यापही पूरस्थिती पूर्णपणे संपलेली नाही. सबब, अशा परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथील दि. ८ ऑक्टोबर रोजीचा समितीचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील दौऱ्याची तारीख यथावकाश कळविण्यात येईल. उर्वरित ठिकाणी म्हणजेच नागपूर, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सोलापूर व मुंबई येथे पूर्वी घोषित केलेल्या दिनांकाप्रमाणे भेटी देण्यात येतील.
०००००
बी.सी.झंवर/विसंअ/