
मुंबई, दि. १६ : संतांच्या भूमीत हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या गौरवशाली शहादतीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी ओवे मैदान, खारघर (नवी मुंबई) येथे भव्य शहिदी समागम कार्यक्रम होणार आहे. ‘हिंद दी चादर’ गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमानिमित मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन दिवसीय व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिले.

कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, तसेच आरोग्य, शिक्षण, पोलीस विभागांचे प्रतिनिधी आणि गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कटीयार म्हणाले की, संस्कृती रक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी श्री गुरु तेग बहादुर यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. त्यांच्या शहादतीचा इतिहास शाळा, महाविद्यालये, संस्था आणि गुरुद्वारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात ३ लाख २० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वक्तृत्व, निबंध व घोषवाक्य स्पर्धा तसेच प्रभातफेरीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
थीम साँग, माहितीपटाद्वारे प्रचार-प्रसिध्दी
याशिवाय व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून २०० शाळा जोडण्यात आल्या असून, थीम साँग आणि माहितीपटाद्वारे विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती देण्यात येत आहे. चेंबूर, देवनार आणि मानखुर्द येथून नवी मुंबईकडे जाणाऱ्या भाविकांसाठी वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेची विशेष तयारी करण्यात आली आहे.
या शहीदी समागमानिमित्त सिख, सिकलगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन आणि वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी सुमारे ३०० वर्षांनंतर एकत्र येणार असून, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या कार्यक्रमातून दृढ होणार आहे. येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीत विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी पश्चिम उपनगरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, बृह्न्मुंबई महानगरपालिकेचे सहायक जनसंपर्क अधिकारी विवेक राठोड, उपविभागीय अधिकारी पूर्व उपनगर कल्पना गोडे, तहसिलदार युवराज बांगर, बोरीवली मुंबई उपनगरचे तहसिलदार इरेश चप्पलवार, शासकीय सदस्य, अंधेरीच्या तहसिलदार स्नेहलता स्वामी, शासकीय सदस्य, कुर्ला नायब तहसिलदार सुनिल कापडनिस, मनमोहन सिंग, एव्हर साईन, मालाड, सुखविंदर सिंग चेंबुर कॅम्प, गुरपिंदर सिंग, गुरू नानक सभा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ
