
मुंबई, दि. ५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था, नवोपक्रम आणि उद्योजकतेचा नवा वेग’ या विषयावर आधारित या मुलाखतीत राज्याच्या स्टार्टअप धोरणांपासून ते जागतिक स्तरावरील संधींपर्यंत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार ९ जून 2026 रोजी रात्री 8.00 वाजता प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमातून देखील प्रसारित करण्यात येणार आहे. या मुलाखतीचे निवेदन निवेदिका डॉ.मृण्मयी भाजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावरील स्टार्टअप इकोसिस्टीम रँकिंगमध्ये ‘लीडर्स’ श्रेणीत कायम राखलेले अग्रस्थान, राज्याची स्टार्टअप पॉलिसी २०२४-२९, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डीप टेक, क्लायमेट टेक, ईव्ही आणि अॅग्रीटेक यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांतील संधी आणि तयारी यावर या मुलाखतीत प्रकाश टाकण्यात आला आहे; तसेच ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये स्टार्टअप संस्कृती रुजवण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, इन्क्युबेशन सेंटर, सेंटर ऑफ एक्सलन्स, सीड फंडिंग, महिला उद्योजक आणि युवा स्टार्टअप्ससाठीच्या विशेष योजना याबाबतही माहिती देण्यात आली आहे.
स्टार्टअप्सना कल्पनेपासून बाजारपेठेपर्यंत पोहोचताना येणारी आव्हाने, इज ऑफ डुईंग बिझनेस रेग्युलेटरी सपोर्ट जागतिक बाजारपेठेतील संधी, कॉर्पोरेट–स्टार्टअप सहयोग, रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकास यावरही डॉ. पाटील यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राला जागतिक स्टार्टअप हब बनविण्यासाठी राज्य शासनाने आखलेला रोडमॅप, ग्रीन आणि सस्टेनेबल स्टार्टअप्ससाठीचा विशेष फोकस; तसेच आगामी धोरणात्मक बदल याविषयीही त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. श्रीकांत पाटील यांनी राज्यातील तरुण, नवउद्योजक आणि स्टार्टअप क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिकांना नवकल्पना, तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या माध्यमातून आत्मनिर्भर महाराष्ट्र घडविण्याचे आवाहन ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले आहे.
000
जयश्री कोल्हे/स.सं.
