Pune | Thu, 19 February 2026

Ad

‘ज्यापाशी आरमार, त्याचा समुद्र’: भारतीय नौदलाचे जनक शिवछत्रपती

Sunil Goyal | 1 views
‘ज्यापाशी आरमार, त्याचा समुद्र’: भारतीय नौदलाचे जनक शिवछत्रपती

छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘ज्यापाशी आरमार, त्याचा समुद्र’ हे सूत्र ओळखून परकीय सत्तेला रोखण्यासाठी स्वदेशी आरमार, अभेद्य जलदुर्गांचे कवच उभारले. त्यांची हीच दूरदृष्टी आणि ‘आत्मनिर्भर’ विचारसरणी आजही भारताच्या सागरी सुरक्षेचा अभेद्य पाया आहे. छत्रपती शिवरायांच्या जयंती त्यानिमित्त या विषयावर थोडक्यात टाकलेला प्रकाश.

सतराव्या शतकातील भारताची राजकीय स्थिती पाहिली, तर एका विचित्र विरोधाभासाचे दर्शन घडते. उत्तरेकडे मोगलांचे साम्राज्य शिखरावर होते. जमिनीवर त्यांची ताकद अफाट होती, पण समुद्राकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अत्यंत संकुचित होती. याउलट, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषतः कोकणात परकीय सत्तांनी धुमाकूळ घातला होता. पोर्तुगीज, इंग्रज, डच आणि जंजिऱ्याचे सिद्दी यांनी अरबी समुद्रावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. परिस्थिती इतकी बिकट होती की, खुद्द मोगल बादशहालाही मक्केला यात्रेसाठी जायचे असेल, तर पोर्तुगीजांकडून ‘काटाझ’ (Cartaz) नावाचा परवाना घ्यावा लागत असे. हा परवाना नसेल, तर जहाजे बुडवली जात किंवा जप्त केली जात. भारतीय व्यापाऱ्यांची अवस्था तर त्याहून दयनीय होती. परकीय सत्तांच्या या ‘सागरी दादागिरी’ला आणि त्यांच्या ‘ब्लू वॉटर पॉलिसी’ला (Blue Water Policy) सुरुंग लावण्याचे धाडस केवळ एकाच राजाने दाखवले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज!

महाराजांनी अगदी सुरुवातीलाच हे ओळखले होते, की परकीय सत्तांचे बळ त्यांच्या आरमारात आहे. त्यांना केवळ जमिनीवरील लढाईत हरवून चालणार नाही, तर समुद्रातच त्यांची नाकेबंदी करणे आवश्यक आहे. यातूनच ‘ज्यापाशी आरमार, त्याचा समुद्र’ (Jalmev Yasya, Balmev Tasya) हे सुप्रसिद्ध सूत्र जन्माला आले. हे केवळ एक वाक्य नव्हते, तर ती भारताच्या भावी सागरी सुरक्षेची आणि सार्वभौमत्वाची पहिली गर्जना होती.

स्वदेशी बनावटीचा आग्रह

सन १६५७ मध्ये कल्याण आणि भिवंडी ही शहरे स्वराज्यात आल्यानंतर महाराजांनी आरमार उभारणीला गती दिली. सुरुवातीला त्यांनी पोर्तुगीज तंत्रज्ञांची मदत घेतली खरी, पण परकीयांवर अवलंबून राहणे भविष्यात धोक्याचे ठरेल, हे त्यांनी तातडीने ओळखले. त्यांनी स्थानिक कारागिरांना जहाजबांधणीचे प्रशिक्षण दिले. युरोपीय जहाजे प्रामुख्याने ‘ओक’ (Oak) लाकडापासून बनली असत. महाराजांनी कोकणातील स्थानिक ‘सागवान’ लाकडाची निवड केली. सागवान हे लाकूड उष्णकटिबंधीय खाऱ्या पाण्यात ओकपेक्षा अधिक काळ टिकते आणि कुजत नाही, हे वैज्ञानिक सत्य महाराजांनी त्या काळात ओळखले होते. कल्याण, भिवंडी आणि पेण येथील गोदीमध्ये (Shipyards) रात्रंदिवस काम सुरू झाले आणि स्वराज्याची पहिली लढाऊ जहाजे समुद्रात उतरली.

भौगोलिक परिस्थिती आणि गनिमी कावा

मराठा आरमाराची रचना करताना महाराजांनी कोकणच्या भौगोलिक परिस्थितीचा खुबीने वापर केला. इंग्रज आणि पोर्तुगीजांची जहाजे आकाराने प्रचंड आणि खोल तळाची (Deep Draft) होती. ती खोल समुद्रात वेगाने धावू शकत, पण उथळ खाड्यांमध्ये किंवा खडकाळ किनाऱ्यावर ती निकामी ठरत. यालाच प्रतिशह देण्यासाठी महाराजांनी मुद्दाम ‘उथळ तळाची’ (Shallow Draft) आणि आकाराने मध्यम जहाजे तयार केली. यात गुराब, गलबत, पाल, मचवा, होडी आणि तरांडी यांचा समावेश होता.

रणनीती अगदी साधी पण प्रभावी होती. मराठा जहाजे शत्रूच्या मोठ्या जहाजांना उथळ पाण्यात किंवा अरुंद खाडीत खेचून आणत. तिथे शत्रूचे मोठे जहाज अडकले, की मराठ्यांच्या छोट्या वेगावान बोटी चहुबाजूने हल्ला चढवत. शत्रूच्या तोफांची दिशा फिरण्याआधीच मराठे जहाजावर चढून ‘हँड-टू-हँड’ लढाई करत. समुद्रातील या ‘गनिमी काव्या’मुळे बलाढ्य युरोपीय सत्तांना कोकणच्या किनाऱ्यावर कधीच पूर्ण ताबा मिळवता आला नाही.

जलदुर्ग: स्वराज्याचे अभेद्य कवच

शिवाजी महाराजांनी आरमाराला बळ देण्यासाठी सागरी किल्ल्यांची एक साखळीच निर्माण केली. हे किल्ले म्हणजे केवळ संरक्षणात्मक वास्तू नव्हत्या, तर ते आरमाराचे ‘लॉजिस्टिक हब’ आणि ‘वॉच टॉवर्स’ होते. सिंधुदुर्ग किल्ल्याचे उदाहरण घेतले, तर आजही थक्क व्हायला होते. हिरोजी इंदुलकरांनी या किल्ल्याचा पाया भरताना ५०० खंडी शिसे (Lead) वापरले, जेणेकरून लाटांच्या तडाख्यात पाया हलू नये.

विजयदुर्ग किल्ल्याची रचना तर आणखीनच कल्पक होती. तिथे समुद्राच्या पाण्याखाली एक संरक्षक भिंत बांधली होती, जी भरतीच्या वेळी दिसत नसे. शत्रूची जहाजे वेगाने किल्ल्याकडे येताना या भिंतीवर आदळून फुटत, पण मराठ्यांच्या उथळ बोटी त्यावरून सहज जात. खांदेरी, उंदेरी आणि कुलाबा यांसारख्या किल्ल्यांनी मुंबईच्या इंग्रजांवर वचपा ठेवला होता.

आधुनिक भारताला प्रेरणा

महाराजांचे आरमार केवळ संरक्षणात्मक नव्हते, तर ते आक्रमकही होते. १६६४ मध्ये ८५ जहाजांच्या ताफ्यासह त्यांनी कर्नाटकातील बसरूरवर (कुंदापूर) केलेला यशस्वी हल्ला, हे मराठा आरमाराच्या ‘शक्ती प्रक्षेपणाचे’ (Power Projection) उत्तम उदाहरण आहे. मायनाक भंडारी, लाय पाटील, दर्यासारंग आणि पुढे कान्होजी आंग्रे यांसारखे निष्ठावान आणि पराक्रमी नौदल प्रमुख या आरमारात घडले. स्थानिक कोळी आणि भंडारी समाजाला संघटित करून महाराजांनी खऱ्या अर्थाने एक ‘लोक-आरमार’ उभे केले.

आजच्या भारताचे ‘महासागर’ (Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across Regions) धोरण आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांची मुळे शिवरायांच्या विचारसरणीतच सापडतात. भारतीय नौदलाने आपल्या ध्वजावर शिवमुद्रेचा अष्टकोनी आकार स्वीकारून महाराजांच्या वारशाचा सन्मान केला आहे. भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ ही शिवरायांच्या स्वदेशी जहाजबांधणीच्या स्वप्नाचे आधुनिक रूप आहे.

३५० वर्षांपूर्वी महाराजांनी दिलेला हा द्रष्टेपणा आजही तितकाच महत्त्वाचा आहे. भारताच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवायच्या असतील, तर ‘ज्यापाशी आरमार, त्याचा समुद्र’ हे सूत्र विसरून चालणार नाही. म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज ‘भारतीय नौदलाचे जनक’ आहेत. शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांच्या या अफाट कार्य कर्तृत्वाला मानाचा मुजरा!

०००

– डॉ. श्याम टरके, सहायक संचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, लातूर

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp