Pune | Thu, 16 July 2026

Ad

‘स्पंदने मनाची – गझल बरखा’मधून मराठी व हिंदी गझलांचा सुरेल स्वरसोहळा

Sunil Goyal | 10 views
‘स्पंदने मनाची – गझल बरखा’मधून मराठी व हिंदी गझलांचा सुरेल स्वरसोहळा

मुंबई, दि. १४ : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘स्पंदने मनाची – गझल बरखा’ या विशेष सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वरसंगत फाऊंडेशन प्रस्तुत या कार्यक्रमातून मराठी आणि हिंदी गझलांचा सुमधुर नजराणा रसिकांसमोर सादर करण्यात येणार आहे. शनिवार, १८ जुलै २०२६ रोजी रात्री ८.३० वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गझल हा भारतीय संगीत परंपरेतील एक अभिजात आणि भावस्पर्शी संगीतप्रकार मानला जातो. शब्दांची नजाकत, सुरांची माधुरी आणि भावनांची सूक्ष्म अभिव्यक्ती यांचा सुंदर संगम गझल या काव्यसंगीत प्रकारामध्ये अनुभवायला मिळतो. त्यामुळे गझल संगीताला देशभरातील रसिकांच्या मनात विशेष स्थान प्राप्त झाले आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून प्रसिद्ध गझल गायक उस्ताद अन्वर कुरेशी यांचे सादरीकरण होणार असून त्यांच्या सुमधुर आणि प्रभावी गायकीचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. त्यांच्यासह अली हुसेन आणि नीजरा आजगांवकर हे कलाकारही आपल्या सुरेल सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहेत.

कार्यक्रमाचे निवेदन सायरा अली हुसेन करणार असून त्यांच्या प्रभावी आणि ओघवत्या निवेदनातून कार्यक्रमातील प्रत्येक सादरीकरणाची भावपूर्ण मांडणी रसिकांसमोर उलगडली जाणार आहे. संगीत, शब्द आणि भावना यांचा सुरेख संगम असलेली ही मैफल गझल रसिकांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

‘स्पंदने मनाची– गझल बरखा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून गझल या अभिजात संगीत प्रकाराचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा तसेच दर्जेदार सांगीतिक परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मराठी आणि हिंदी गझलांच्या विविध छटांचा अनुभव या कार्यक्रमातून रसिकांना घेता येणार आहे.

हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे, अभिजात संगीत, गझल आणि विविध कलाप्रकारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे तसेच गुणवंत कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून संगीतप्रेमी, गझल रसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल सांगीतिक मैफिलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

000

संजय ओरके/विसंअ

 

 

 

 

वृत्तक्र. 2533

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp