मुंबई, दि. ३० : केंद्रीय संस्कृती मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘ नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या वतीने २५ वा भारत रंग महोत्सव ३ ते ५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मुंबईत होणार आहे. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य राहील. त्यासाठी यंत्रणेने नियोजन करून कार्यवाही करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
या बैठकीला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक चित्ररंजन त्रिपाठी, सदस्य वाणी त्रिपाठी, राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, अवर सचिव बाळासाहेब सावंत उपस्थित होते.
मंत्री ॲड.शेलार म्हणाले, या भारत रंग महोत्सवासाठी येणाऱ्या कलाकारांच्या आदरातिथ्याची व्यवस्था करावी. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे मुंबईमध्ये केंद्र सुरु करण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि संस्कृती मंत्रालयाच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये सामंजस्य करार करण्यात यावा.
मुंबईतील केंद्राच्या माध्यमातून नाट्य क्षेत्रातील वारसा, परंपरांचे संवर्धन आणि कलाकारांचे सक्षमीकरण होईल, असा विश्वास मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.
०००
नीलेश तायडे/विसंअ/