Pune | Tue, 17 March 2026

Ad

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी अनुभवली ‘गोरेगाव चित्रनगरी’

Sunil Goyal | 10 views
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी अनुभवली ‘गोरेगाव चित्रनगरी’

मुंबई, दि. २० : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्मसिटी) येथे यवतमाळ येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांनी भेट दिली. या महिलांना संपूर्ण चित्रनगरी फिरण्याची संधी मिळाली. या महिलांचे चित्रनगरीचे सह-व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी स्वागत केले.

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे ‘रसिकाश्रय’ संस्था ही गेले 25 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी ‘जीवाची मुंबई’ हा आगळा वेगळा उपक्रम राबविला जातो. यावर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून पतीच्या निधनानंतर शेती आणि घराची जबाबदारी पेलणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याच्या दुर्गम भागातील महिलांना मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीची सफर घडवून आणण्यात आली.

आजवर ज्या मालिका आणि चित्रपट केवळ दूरदर्शनच्या पडद्यावर पाहिले होते, त्याचे प्रत्यक्ष चित्रीकरण कसे चालते, भव्य सेट कसे असतात आणि कलाकार प्रत्यक्षात कसे दिसतात, याचा प्रत्यक्ष अनुभव महिलांनी या सहलीच्या माध्यमातून घेतला. यावेळी महिलांना चित्रीकरण कसे चालते, याविषयी मार्गदर्शन देखील करण्यात आहे. गोरेगाव चित्रनगरीत या महिलांचे आगमन झाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि कुतूहल पाहायला मिळाले.”आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मुंबईला येऊन चित्रनगरी प्रत्यक्ष पाहता येईल,” अशी भावूक प्रतिक्रिया यावेळी अनेक महिलांनी दिली.

चित्रनगरीत दाखल झालेल्या या महिलांकरिता प्रशासनाने त्यांना चित्रीकरणाच्या पडद्यामागचे जग जवळून पाहण्यासाठी विशेष सहकार्य केले.

०००

संजय ओरके/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp