Pune | Wed, 03 June 2026

Ad

आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी बांधली विवाह गाठ; गोलू आणि संगीताची नव्या आयुष्याकडे वाटचाल

Sunil Goyal | 1 views
आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी बांधली विवाह गाठ; गोलू आणि संगीताची नव्या आयुष्याकडे वाटचाल

गोंदिया, दि. ३ : गोंदिया जिल्ह्यातील 15 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून त्यापैकी पांडू पुसू वड्डे ऊर्फ गोलू आणि सैवंती रायसिंग पंधरे ऊर्फ संगीता या दोघांनी विवाह गाठ बांधत आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. येथील पोलीस मुख्यालयात विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा विवाह समारंभ नुकताच पार पडला.

37 वर्षीय पांडू पुसू वड्डे, रा. तिरलागड, ता. पखांजूर, जि. कांकेर (छत्तीसगड), माओवादी संघटनेत गोलू या नावाने ओळखला जात होता. तो सीपीआय (माओवादी) संघटनेत दर्रेकसा एरिया मध्ये डिव्हिजनल कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होता.

36 वर्षीय सैवंती रायसिंग पंधरे, रा. राशीमेटा, ता. बैहर, जि. बालाघाट (मध्य प्रदेश), माओवादी संघटनेत संगीता या नावाने ओळखली जात होती. ती दरेकसा एरिया कमिटीमध्ये एरिया कमिटी सदस्य  म्हणून कार्यरत होती. अनेक वर्षे हिंसाचार, संघर्ष आणि अनिश्चिततेच्या वातावरणात जीवन व्यतीत केल्यानंतर या दोघांनीही 28 नोव्हेंबर 2025 रोजी गोंदिया पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात परतण्याचा धाडसी निर्णय घेतला. समाजात सन्मानाने जगण्याची, स्वतःचे कुटुंब उभे करण्याची आणि शांततामय भविष्य घडविण्याची त्यांची इच्छा या निर्णयामागे होती.

शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन योजनांतर्गत नमूद आत्मसमर्पित माओवाद्यांचे आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, बँक खाते, आणि इतर विविध आवश्यक कागदपत्रे तयार करणे, रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणे; तसेच त्यांचे पुनर्वसन संबंधाने इतर कार्यवाही सुरु आहे.

पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या संकल्पनेतून; तसेच प्रभारी पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी परिवर्तन आणि नव्या जीवनप्रवासाचे प्रतीक ठरणारा एक हृदयस्पर्शी व प्रेरणादायी विवाह सोहळा पार पडला. शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणाच्या यशाचे जिवंत उदाहरण म्हणून दोन आत्मसमर्पित नक्षल सदस्य विवाहबंधनात अडकले आणि शांततामय, सन्माननीय जीवनाची नवी सुरुवात केली.

या विवाह सोहळ्यामुळे अद्याप जंगलात कार्यरत असलेल्या माओवादी सदस्यांनाही एक सकारात्मक संदेश मिळतो की, हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केल्यास त्यांनाही सन्मानाने, सुरक्षिततेने आणि आनंदाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध आहे. प्रत्येक व्यक्तीला नव्याने उभे राहण्याची आणि समाजात आपले स्थान निर्माण करण्याची दुसरी संधी मिळू शकते, हा विश्वास या घटनेने अधिक दृढ केला आहे.

संपूर्ण विवाह सोहळा शांततापूर्ण वातावरणात आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता यशस्वीरित्या पोलीस मुख्यालय कारंजा गोंदिया येथील प्रेरणा सभागृहात पार पडला. प्रभारी पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक, नक्षल सेल   प्रमोद भातनाते, राखीव पोलीस निरीक्षक राजेश सरोदे,  पोलीस उपनिरीक्षक नक्षल सेल  श्रीकांत हत्तीमारे, नक्षल ऑपरेशन सेल देवरी मल्लिकार्जुन वासुदेव,  तसेच नक्षल सेल गोंदिया, इंट सेल देवरी, सी 60 पथक आणि पोलीस मुख्यालय, गोंदिया येथील पोलीस स्टाफने आवश्यक समन्वय व सहकार्य उपलब्ध करून दिले.

हा विवाह केवळ एक सामाजिक कार्यक्रम नसून परिवर्तन, पुनर्मिलन, विश्वास आणि शांततामय भविष्याच्या आशेचा उत्सव आहे – पोलीस अधीक्षक, गोंदिया

००००

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp