Pune | Tue, 17 March 2026

Ad

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

Sunil Goyal | 10 views
अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. २५ : राज्यातील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

मंत्रालय येथे बैठकीत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती तसेच संयुक्त संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या अध्यक्ष माया परमेश्वर, कृती समितीच्या अध्यक्ष शुभा शमीम, कर्मचारी संघाचे संघटक चिटणीस राजेश सिंह यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम शंभर टक्के प्रामाणिक व समर्पित असल्याचे नमूद करत प्रोत्साहन भत्त्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ग्रॅच्युईटी, पेन्शन यांसारख्या मुद्द्यांवर अभ्यास अंती निर्णय घेण्यात येईल, असेही स्पष्ट केले. पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अद्ययावत माहिती नियमितपणे अपडेट केल्यास काम अधिक प्रभावी होईल.तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येईल. शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून त्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असे सांगितले.

बैठकीत प्रोत्साहन भत्ता सरसकट मानधनात वर्ग करणे, ग्रॅच्युईटी व पेन्शन, आजारपणाच्या काळात भरपगारी रजा, अंगणवाडी केंद्रात दरमहा टीएचआर कोटा देणे, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’योजनेतील फॉर्म भरल्याबद्दल प्रोत्साहन भत्ता, मदतनीस ते सेविका पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांचे व मिनी अंगणवाडी सेविकांची वयोमर्यादा, तसेच योजनांच्या कामासाठी सर्वत्र मोबाईल नेटवर्क उपलब्ध करणे, पूरक पोषण आहाराचा दर्जा सुधारणे मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

०००

जयश्री सुभाष कोल्हे – महाले/स.सं

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp