Pune | Fri, 05 June 2026

Ad

अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांची कुडाळ तालुक्यातील विविध कार्यालयांना भेट

Sunil Goyal | 3 views
अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांची कुडाळ तालुक्यातील विविध कार्यालयांना भेट

सिंधुदुर्गनगरी, दि. ५ (जिमाका) :– महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज कुडाळ तालुक्यातील विविध ठिकाणांना भेट देत महसूल विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. क्षेत्रीय स्तरावरील प्रशासन, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, ऑनलाइन दाखला प्रणाली तसेच विविध महसुली योजनांच्या अंमलबजावणीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दौऱ्याच्या प्रारंभी श्री. खारगे यांनी माणगाव महसूल मंडळातील बेनगाव येथे भेट दिली. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाच्या माध्यमातून पारधी समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती. या निर्णयामुळे समाजाच्या दळणवळणाचा महत्त्वाचा प्रश्न सुटला असून रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून प्रशासनाच्या कामाबाबत अभिप्राय जाणून घेतला. प्रशासनाच्या पुढाकारामुळे दीर्घकालीन प्रश्न मार्गी लागल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यानंतर अप्पर मुख्य सचिवांनी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, माणगाव तसेच मंडळ अधिकारी कार्यालय, माणगाव येथे भेट देऊन महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. क्षेत्रीय पातळीवर काम करताना येणाऱ्या अडचणी, नागरिकांना सेवा देताना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबाबत त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. महसूल सेवा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी आवश्यक सूचना देखील त्यांनी दिल्या.

दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय, माणगाव येथील सेतू केंद्राला भेट देऊन शासनामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध दाखला सेवांची माहिती घेतली. यावेळी नव्याने ऑनलाइन दाखला प्रणालीमध्ये Government Process Reengineering (GPR) अंतर्गत करण्यात आलेल्या सुधारणांचा त्यांनी आढावा घेतला. या सुधारणांमुळे नागरिकांना मिळणारी सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सेवा वितरण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी श्री. खारगे यांनी माणगाव येथील प्राचीन दत्त मंदिरालाही भेट दिली. मंदिराचा इतिहास, धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व याविषयी माहिती जाणून घेत त्यांनी स्थानिक वारसा जतन करण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

००००००

 

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp