Pune | Thu, 09 October 2025

Ad

अतिवृष्टीने नुकसान झालेले मत्स्यव्यावसायिक मदतीपासून वंचित राहणार नाहीत – मंत्री नितेश राणे

Sunil Goyal | 10 views
अतिवृष्टीने नुकसान झालेले मत्स्यव्यावसायिक मदतीपासून वंचित राहणार नाहीत – मंत्री नितेश राणे

छत्रपती संभाजीनगर, (विमाका) दि. ०३: मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही फटका बसला आहे. जलाशय, तलाव, मत्स्यपालन केंद्रे पाण्याखाली गेली असून बोटी, होडी, जाळी, मत्स्यबीज यासह उपकरणांचे आणि मत्स्यपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी आज नुकसानीचा आढावा घेतला. प्रत्येक मत्स्यपालकांचे नुकसान व्यवस्थित नोंदविले गेले पाहिजे, शेतकऱ्याप्रमाणेच मत्स्यपालकांनाही शासनाची मदत मिळाली पाहिजे, यासाठी नुकसानग्रस्त मत्स्यव्यावसायिकांचे तत्परतेने पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवा, असे निर्देशही त्यांनी दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला मत्स्यव्यावसायिक मदतीपासून वंचित राहणार नाही, शासन म्हणून आपण मत्स्यव्यावसायिकांच्या पाठीशी असल्याचे सांगत उपस्थित मत्स्यव्यावसायिकांना त्यांनी धीर दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री राणे यांनी आज छत्रपती संभाजीनगर व लातूर या दोन्ही विभागाच्या नुकसानीबाबत आढावा घेतला. यावेळी विभागाचे आयुक्त किशोर तावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुरेश भारती, सहायक आयुक्त मधुरिमा जाधव यांच्यासह मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच मत्स्यव्यावसायिक उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, प्रत्येक मत्स्यपालकाचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान अचूक नोंदविले गेले पाहिजे, शेतकऱ्याप्रमाणेच मत्स्यपालकानांही शासनाची मदत मिळाली पाहिजे. पंचनामे अचूक करून त्याबाबतचा अहवाल तातडीने शासनाकडे पाठवा जेणेकरून त्याआधारे तातडीने मदत देता येईल. मत्स्यपालकांना या संकटातून उभे करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्या दृष्टीने प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून काम करावे. जलसंपदा विभागाने गाळ काढण्याबाबतचा कार्यक्रम तयार करावा. याबाबत राज्यस्तरीय कार्यक्रमाची आखणी मंत्रालय पातळीवरून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री राणे म्हणाले, नुकसान भरपाईसोबत मत्स्यव्यावसयिकांना विविध सवलती देण्यासंदर्भात शासन सकारात्मक आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने ज्या जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले त्याठिकाणचे मनुष्यबळ ज्याठिकाणी पंचनामे बाकी आहेत तिथे तातडीने उपलब्ध करून द्यावे. मत्स्यबीजाच्या दरामध्ये असलेल्या तफावतीबाबत आपण लवकरच निर्णय घेणार असून जिल्हा परिषदेअंतर्गत तलावांचे पंचनामे वेळेत करण्याबाबतही ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भारती यांनी माहिती दिली. भारती म्हणाले, छत्रपती संभाजीनगर विभागात 385 तलाव आहेत. यामध्ये 330 तलावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे जाळी, बोटी, होडी, मत्स्यबीज, मत्स्यसाठा याचे नुकसान झाले आहे. तसेच विभागात असलेल्या पिंजरा मत्स्य संवर्धन प्रकल्पाचे देखील नुकसान झाले आहे. याबाबत नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम गतीने सुरू असून याबाबतचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे.

लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त शिरिष गाथाडे यांनी लातूर विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड व हिंगोली या चार जिल्ह्यांतील नुकसानीबाबत माहिती दिली. गाथाडे म्हणाले, लातूर विभागात एकूण 516 तलाव/जलाशय आहेत. अतिवृष्टीमुळे मत्स्यबीज, मत्स्यसाठी, होडी, जाळे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

लातूर विभागात चार जिल्ह्यांचा समावेश असुन लातूर, धाराशिव, नांदेड व हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश होतो. लातुर जिल्हयात १५८ तलाव, धाराशिव २३६ तलाव नांदेड ९३ तलाव व हिंगोलीमध्ये ३० असे एकूण ५१६ तलाव / जलाशय आहेत. लातूर विभागात गोदावरी, मांजरा, रेणा, पुर्णा, तेरणा, सिना, तावरजा इ. प्रमुख नद्या आहेत. सद्यस्थितीत मराठवाड्यात माहे २५ ऑगस्ट २०२५ ते माहे सप्टेंबर २०२५ अखेर कालावधीत अतिवृष्टी होऊन पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने मच्छिमारांचे मत्स्यबीज, मत्स्यसाठा, होडी, जाळे इत्यादीचे नुकसान झालेले आहे.

लातूर जिल्ह्यात १० तालुके असुन ६० मंडळे, धाराशिव जिल्ह्यात ०८ तालुके व ५७ मंडळे, नांदेड जिल्ह्यात १६ तालुके व ७३ मंडळे तसेच हिंगोली जिल्ह्यात ०५ तालुके व मंडळे ३० असुन लातूर विभागात एकुण ३९ तालुके व २२० मंडळे आहेत. २२० पैकी १९२ मंडळात ६५ मिमी पेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

यावेळी मत्स्यव्यावसायिकांनी आपल्या झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp