Pune | Mon, 16 February 2026

Ad

शिवनेरीवर दिमाखदार ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव : हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’चे आयोजन – मंत्री शंभूराज देसाई

Sunil Goyal | 1 views
शिवनेरीवर दिमाखदार ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव : हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’चे आयोजन – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. १६ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची पावन जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या मैदानावर १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पुणे जिल्हा प्रशासन आणि पर्यटन विभागाच्या वतीने ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव : हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत आयोजित या महोत्सवाच्या माध्यमातून शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देणारे सांस्कृतिक, क्रीडा आणि लोककलेचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

या महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन १७ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे सांगून पर्यटन मंत्री

देसाई म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या जन्मस्थानी हा महोत्सव साजरा करताना अभिमान वाटत असून, याद्वारे महाराजांचे विचार आणि शिवकालीन संस्कृती नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. हा महोत्सव पर्यटनाच्या दृष्टीनेही मैलाचा दगड ठरेल.”

पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी या नियोजनाबाबत सांगितले की, ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव : हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’चे स्वरूप सर्वसमावेशक असून यामध्ये महाराष्ट्रातील पारंपरिक कलागुणांना वाव देण्यात आला आहे. प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून पर्यटकांना उत्तम सुविधा देण्यावर भर आहे. पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले की, “स्थानिक लोककला, खेळ आणि संस्कृतीचे संवर्धन करणे हा या महोत्सवाचा मूळ उद्देश आहे. शिवभक्तांनी आणि पर्यटकांनी या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”

तीन दिवसीय या कार्यक्रमात १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन सोहळा होईल, तर लोकगीतांवर आधारित द फोक आख्यान, भव्य कबड्डी स्पर्धा, बैलगाडा शर्यत, महिला बचत गटांचे प्रदर्शन आणि खाद्य महोत्सव आकर्षणाचे केंद्र ठरेल. १८ फेब्रुवारी रोजी बैलगाडा शर्यत, लोककलेवर आधारित ‘द अभंग रिपोस्ट, महिला बचत गटांचे प्रदर्शन आणि खाद्य महोत्सव, केसरी कुस्ती स्पर्धा, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना, ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे.

महोत्सवाच्या अंतिम दिवशी, १९ फेब्रुवारीला सकाळी शिवकालीन मर्दानी खेळांचे चित्तथरारक सादरीकरण, महिला बचत गटांचे प्रदर्शन आणि खाद्य महोत्सव, तसेच सायंकाळी ५ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांच्या महाआरतीने आणि बहुरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी या महोत्सवाची सांगता होईल. या ऐतिहासिक सोहळ्यात नागरिकांनी सहभागी होऊन शिवजन्मोत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp