
नाशिक, दि. १५ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक येथे गोदावरीच्या तीरावर २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत चौथे विश्व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनाच्या यशस्वितेसाठी सर्व प्रशासकीय विभागांनी परस्पर समन्वय ठेवत परिपूर्ण नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिल्या.
नाशिक येथे होणाऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. सामंत यांनी आज दुपारी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या मध्यवर्ती सभागृहात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले, कौशल्य विकास विभागाचे सहसंचालक अनिल गावित, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, महानगरपालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले की, विश्व मराठी संमेलनाच्या पूर्वसंध्येला मराठी भाषा पुरस्कार वितरण सोहळा होईल. विश्व मराठी संमेलनात पुस्तकांच्या स्टॉलसह विविध विभागांचे स्टॉल राहतील याची दक्षता घ्यावी. त्यात नाशिकची ओळख सांगणाऱ्या स्टॉलचा समावेश असावा. तसेच स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तूंच्या स्टॉलचा समावेश करावा. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, पाणीपुरवठा आदी सुविधांची उपलब्धता राहील, असेही नियोजन करावे. कुसुमाग्रज उद्यानाची नियमितपणे स्वच्छता करावी. पुढील वेळी कुसुमाग्रज उद्यानास भेट देण्यात येईल. यावेळी मंत्री श्री. सामंत यांनी मराठी भाषा पुरस्कार, साहित्यिकांची निवास व्यवस्था, मराठी भाषा विभागाचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, विश्व मराठी संमेलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी नियोजन करण्यात येत आहे. संमेलनाच्या तयारीचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. संमेलनाच्या यशस्वितेसाठी परिपूर्ण नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी सांगितले की, विश्व मराठी संमेलनासाठी संस्थेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. त्यासाठी संस्थेच्या आवारात संमेलन कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. संमेलनाची पूर्व तयारी सुरू असून कोणतीही उणीव राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
०००००
